अहिल्यानगर बँकेच्या निवडणुकीत आश्चर्याचा धक्का बसणार; दोन कट्टर विरोधक आमने-सामने, चेअरमन पद…
अहिल्यानगर बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदोन होत आहे. या निवडणुकीत दोन कट्टर विरोधकांचा सामना होणार होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या १० जागांसाठी आज मतदान होणार आहे. 21 पैकी 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यातील उर्वरित 10 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 3 हजार 837 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नगरच्या 14 तालुक्यांतील 33 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीत विखे-थोरात सहकार पॅनल विरुद्ध खासदार निलेश लंके यांच्या परिवर्तन पॅनल सामना होणार आहे. दोन्ही नेते एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. पारनेरमधील निलेश लंके विरुद्ध विखे समर्थक राहुल शिंदे लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
विखे पाटलांचा मोठा दावा
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सुजय विखे पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी राहता येथील मतदान केंद्रात सुजय विखे यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर सुजय विखे पाटील म्हणाले, सहकारात निवडणूक बिनविरोध व्हावी ही अपेक्षा असते. मात्र प्रत्येकाला संधी देणे शक्य नसतं. या निवडणूक प्रचारात कुठेही आरोप-प्रत्यारोप आणि चिखलपेक झाली नाही. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वांनी सहकारातील सुसंस्कृतपणा कायम राखला. चेअरमन पदासाठी माध्यमांनी माझे नाव चर्चेत ठेवलं. मात्र जेव्हा कधी चेअरमनची निवड होईल, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का लागेल, एवढे मात्र निश्चित आहे’.
बाळासाहेब थोरात निलेश लंकेंवर काय म्हणाले?
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी बाळासाहेब थोरात यांनी मतदानाचा हक्क बजावला. संगमनेर येथील मतदान केंद्रावर बाळासाहेब थोरात यांनी मतदान केलं. त्यानंतर बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न होता. 11 जागा बिनविरोध झाल्या, सर्व एकत्र बसले हे काही कमी नाही’.
निलेश लंके यांच्यावर थोरात म्हणाले, ‘प्रत्येक तालुक्याचे राजकारण वेगळं असतं. स्थानिक पातळीला काही संघर्ष असतात. मात्र जे झालं ते ठीक झालं असच म्हणावं लागेल. राजकारण व्यक्तिगत स्वरूपाचे नसावं. सहकारात एका पक्षाचे लोक संस्थेवर जाऊ शकत नाही. विविध पक्ष असतातच. मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे, हे राजकारणाचे गमक असतं. अलीकडच्या काळात व्यक्तीद्वेष वाढला आहे.