मालवाहतुकीची दरवाढ, ट्रकऐवजी थेट एसटीतून 12 टन कांदा वाहतूक, नगरवरुन APMC मध्ये कांदा दाखल

| Updated on: Jun 10, 2020 | 3:31 PM

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चक्क एसटी बसमधून 12 टन कांदे विक्रीसाठी मुंबई बाजार समितीत पाठविले आहेत. (Navi Mumbai St Bus use For Onion supply)

मालवाहतुकीची दरवाढ, ट्रकऐवजी थेट एसटीतून 12 टन कांदा वाहतूक, नगरवरुन APMC मध्ये कांदा दाखल
Follow us on

नवी मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेले तीन महिने बंद असलेले आर्थिक चक्र अनलॉक 1 च्या माध्यमातून हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र इतके दिवस उद्योगधंदे बंद राहिल्यामुळे आता महागाईची झळ बसू लागली आहे. लॉकडाउनमुळे कृषी मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांनी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चक्क एसटी बसमधून 12 टन कांदे विक्रीसाठी मुंबई बाजार समितीत पाठविले आहेत. (Navi Mumbai St Bus use For Onion supply)

लॉकडाऊनमुळे कित्येक दिवस बंद असलेले मार्केट शेतकऱ्यांसाठी मोठा चिंतेचा विषय बनला होता. त्यावर तोडगा काढत नगरच्या शेतकऱ्यांनी एसटीमधून कांदे आणण्याचा एक वेगळा मार्ग निवडला. तसेच एपीएमसी मार्केटमध्ये पहिल्यांदाच अश्या प्रकारे एसटीद्वारे कांदा आणल्याने दिवसभर याचीच चर्चा सुरू होती.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले तालुक्यातून मुंबईत 12 टन कांद्याचा ट्रक पाठवण्यासाठी 16 हजार रुपये भाडे द्यावे लागत होते. मात्र एसटीमधून कांदे आणण्यासाठी फक्त 11 हजार 800 भाडे आकारले जाणार होते. यामुळे काही शेतकऱ्यांनी एसटी महामंडळाशी संपर्क साधत चक्क एसटीमधून कांदा मुंबई बाजार समितीत पाठविला. ट्रकच्या तुलनेत त्यांची 3 हजार रुपयांची बचत झाली.

कांदे बटाटा बाजारात एसटी इतक्या आत कशी आली असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र एसटीमधून जेव्हा कांदे बाहेर येऊ लागले तेव्हा सर्वांच्या नजरा या लालपरीकडे वळल्या. एपीएमसी मार्केटमध्ये कितीतरी वेळा परराज्यातून अथवा परदेशातून येणारा माल कन्टेनरमधून येतो. मात्र बाजारात एसटी येण्याची मात्र ही पहिलीच वेळ !

प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाची गाडी शेतकऱ्यांच्याही सेवेत कमी आल्याने ही लालपरी मार्केटमध्ये उत्सुकतेचा विषय बनली. (Navi Mumbai St Bus use For Onion supply)

संबंधित बातम्या : 

PHOTO : नवी मुंबईत दिव्यांगांकरिता राज्यातील पहिले कोव्हिड रुग्णालय

ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू, आव्हाडांकडून हळहळ व्यक्त