‘सत्याचा विजय होतो, मराठी माणसांनी आमच्या पाठीमागं उभं राहावं’, अक्षता नाईक यांचं भावनिक आवाहन

| Updated on: Nov 09, 2020 | 10:03 PM

"सत्याचा विजय होतो. या लढाईत मराठी माणसांनी आमच्या पाठीमागे उभं राहावं", असं भावनिक आवाहन अक्षता नाईक यांनी केलं (Akshata Naik appeal to Maharashtrian for support).

सत्याचा विजय होतो, मराठी माणसांनी आमच्या पाठीमागं उभं राहावं, अक्षता नाईक यांचं भावनिक आवाहन
Follow us on

रायगड : “सत्याचा विजय होतो. या लढाईत मराठी माणसांनी आमच्या पाठीमागे उभं राहावं”, असं भावनिक आवाहन अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना केलं आहे. तर अलिबाग सत्र न्यायालयाच्या कामकाजावर अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी समाधान व्यक्त केलं. “आम्ही न्यायाच्या दिशेने एक पाऊल पुढे पोहोचलो”, अशी प्रतिक्रिया आज्ञा यांनी दिली (Akshata Naik appeal to Maharashtrian for support).

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी आणि इतर दोन जणांना अटक केली आहे. अर्णव यांना पोलीस कोठडी देण्याच्या पोलिसांच्या याचिकेवर आज (9 नोव्हेंबर) अलिबाग सत्र न्यायालयात युक्तिवाद झाला. दरम्यान, या सुनावणीसाठी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक अलिबाग येथे आल्या होत्या. यावेळी नाईक कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं (Akshata Naik appeal to Maharashtrian for support).

अर्णव गोस्वामी यांना सत्र न्यायालयाकडून आज दिलासा नाही 

मुंबई उच्च न्यायालायने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना सत्र न्यायालयातूनही दिलासा मिळाला नाही. अर्णव यांना पोलीस कोठडी देण्याच्या पोलिसांच्या याचिकेवर आज युक्तिवाद झाला. त्यामुळे अर्णव यांच्या जामिनाच्या अर्जावर आज कामकाज होऊ शकले नाही. त्यावर उद्या सुनावणी होणार असल्याने अर्णव यांना आजची रात्रही तळोजा तुरुंगात काढावी लागणार आहे.

पत्रकार अर्णव गोस्वामी यांनी अंतरिम जामीन मिळावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज फेटाळत न्यायालयाने गोस्वामी यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासाला बेकायदेशीर ठरवता येणार नाही. पोलिसांना तपासासाठी न्यायालयाच्या परवानगीची गरज नाही. असं मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. या निर्णयानंतर गोस्वामी तसेच इतर दोघांचे वकील अलिबाग सत्र न्यायालयात हजर झाले. त्यानंतर अर्णव गोस्वामी यांच्या वकिलांनी सत्र न्यायालयाच्या दुपारच्या सत्रात जामीन अर्ज दाखल केला. मात्र, सत्र न्यायालयात आधीच अलिबाग पोलिसांनी अर्णव यांच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज केलेला आहे. त्यावर युक्तिवाद झाल्याने अर्णव यांच्या जामिनावर उद्या युक्तीवाद होणार आहे. त्यामुळे त्यांना आजही जामीन मिळू शकला नाही.

दरम्यान, अलिबाग मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी गोस्वामी यांच्यासह इतर दोघांची चौकशी करण्यास पोलिसांना परवानगी दिली आहे. निर्णयानुसार पोलिसांना अर्णव यांच्यासह इतर दोघांची दररोज तीन तास चौकशी करता येणार आहे.

आज मुंबई उच्च न्यायालयात काय झाले?

अर्णव यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने एफआयआर रद्द करण्यासाठी आणि जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. तीन दिवस त्यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर आज कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावत अर्णव यांना जामीन देण्यास नकार दिला. हे एक्सट्रा ऑर्डिनरी प्रकरण नाही. त्यामुळे जामिनासाठी ज्या प्रचलित यंत्रणा आणि पद्धती आहे. त्यानुसारच अर्ज करून जामीन घेण्यात यावा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणात जामीन दिल्यास ही प्रथा पडून जाईल आणि कोणीही उठसूठ उच्च न्यायालयात येऊन जामिनासाठी अर्ज करेल, असं मतही कोर्टाने व्यक्त केलं. तसेच जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देशही कोर्टाकडून देण्यात आले आहेत.

कोर्टाच्या या स्पष्ट निर्देशामुळे आता अर्णव यांच्या वकिलांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर सत्र न्यायालय निर्णय देईल. तोपर्यंत अर्णव यांना तळोजा तुरुंगातच राहावं लागणार असल्याचं चित्रं आहे.

संबंधित बातमी :

अर्णव गोस्वामींची आजची रात्रही तुरुंगातच, उद्या पुन्हा सुनावणी; पोलिसांना तीन तास चौकशी करण्याची परवानगी