‘शरद पवार यांच्या बाजूला बसण्याची माझ्यात ताकद, आता तुम्हालाही सतरंज्या उचलायाला लावणार’, राष्ट्रवादी काँग्रेसला कुणाचं आव्हान?

| Updated on: Feb 07, 2023 | 12:30 PM

मी मुस्लिमांमध्ये एक विश्वास निर्माण केलाय. मी कोणत्याही पातळीवर जाऊन आव्हान देऊ शकतो, अशी भूमिका खासदाराने घेतली आहे.

शरद पवार यांच्या बाजूला बसण्याची माझ्यात ताकद, आता तुम्हालाही सतरंज्या उचलायाला लावणार, राष्ट्रवादी काँग्रेसला कुणाचं आव्हान?
Image Credit source: social media
Follow us on

दत्ता कनवटे, औरंगाबादः एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) सेक्युलर अर्थात धर्मनिरपेक्ष बनले तर त्यांचं पक्षात स्वागत आहे, असं वक्तव्य राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केलं. खासदार इम्तियाज जलील यांनी टोपेंना उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह सर्वच नेत्यांना मैदानात खेचण्याची भाषा केली आहे. धर्मनिरपेक्षतेची तुमची आणि आमची व्याख्या वेगळी आहे. आता तर शरद पवार यांच्या बाजूला बसण्याची आमची ताकद आहे, त्यामुळे तुमच्यावर सतरंज्या उचलण्याची वेळ आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खा. जलील यांनी दिलाय.

काय म्हणाले खा. जलील?

औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राजेश टोपेंना सडेतोड उत्तर दिलंय. ते म्हणाले, धर्मनिरपेक्षतेची तुमची आणि माझी व्याख्या यात खूप फरक आहे. औरंगाबादसारख्या एखाद्या शहरातून एखाद्या मुस्लिमाला निवडून आणावं, अशी तुमची धर्मनिरपेक्षता असती तर ती मला मान्य झाली असती….

पण इम्तियाज जलील एमआयएम सारख्या पक्षातून निवडून येतो आणि तुम्ही म्हणता की हा कट्टरता वादी आहे… तर याला धर्मनिरपेक्षता म्हणायची का? फक्त मुस्लिमांना खुश करण्यासाठी आहे का? तुमचे नेते लोकसभा-विधानसभेत जाणार आणि आमच्या पक्षाचे नेते महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये अडकून पडणार.. हे आता चालणार नाही, असं वक्तव्य खा. जलील यांनी केलंय.

‘मी मुस्लिमांमध्ये विश्वास निर्माण केला’

तुम्ही आणि तुमचे बाप लोकसभा-राज्यसभेवर जाणार अन् आम्ही स्थानिक पातळीचेच नेते राहणार. मी मुस्लिमांमध्ये एक विश्वास निर्माण केलाय. मी कोणत्याही पातळीवर जाऊन आव्हान देऊ शकतो, अशी भूमिका खासदाराने घेतली आहे.

‘शरद पवारांच्या बाजूला बसण्याची ताकद’

आता मी शरद पवारांच्या खाली नाही तर बाजूला बसण्याची ताकद आहे. राजेश टोपे खुर्चीवर बसेन आणि इम्तियाज जलील सजरंजीवर बसेल असं वाटत असेल तर ते दिवस गेले. तुम्हालाही आता सतरंज्या उचलाव्या लागतील, अशी वेळ आणून दाखवेन, असं वक्तव्य खा. इम्तियाज जलील यांनी केलंय.

औरंगाबादला खासदारकीचे वेध

पुण्यात पोट निवडणुकांनी राजकीय वातावरण तापलं असताना औरंगाबादला लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे हेच खासदार होतील, मी त्यांना पाठिंबा देणार आहे, अशी भूमिका कन्नडचे माजी आमदार आणि शिवसेनेचे बंडखोर हर्षवर्धन जाधव यांनी घेतली आहे. तर यंदाही निवडणूक मीच जिंकणार असा आत्मविश्वास खासदार इम्तियाज जलील यांनी दर्शवला आहे. एमआयएम पक्षाकडून २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक जिंकली होती.

शिंदे की भाजप?

तर शिवसेनेत अभूतपूर्व बंडखोरी झाल्याने औरंगाबाद शिवसेनेचेही दोन गट पडले आहेत. आता शिंदे गटाच्या शिवसेनेकडून लोकसभा कोण लढवणार अशी चर्चा आहे. पैठणचे आमदार व रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे यांनी लोकसभेसाठी तयारीही दर्शवली आहे. तर भाजपनेही लोकसभेची तयारी सुरु केली आहे. भाजपकडून डॉ. भागवत कराड निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे.