बीडमधील मेडिकल स्फोटाला वेगळं वळण, स्फोटात मृत्यू झालेल्या डॉक्टरविरोधातच गुन्हा दाखल

| Updated on: Jun 10, 2020 | 6:14 PM

जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात मेडिकलमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. मृत झालेल्या डॉक्टरांनीच हा स्फोट घडवून आणल्याचा संशय मेडिकल चालकाने आपल्या जबाबात व्यक्त केला आहे (Blast in Medical Store in Beed ).

बीडमधील मेडिकल स्फोटाला वेगळं वळण, स्फोटात मृत्यू झालेल्या डॉक्टरविरोधातच गुन्हा दाखल
Follow us on

बीड : जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात मेडिकलमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. मृत झालेल्या डॉक्टरांनीच हा स्फोट घडवून आणल्याचा संशय मेडिकल चालकाने आपल्या जबाबात व्यक्त केला आहे (Blast in Medical Store in Beed ). यानंतर स्फोटात मृत्यू झालेल्या डॉक्टरांवरच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर चोरमले असं या डॉक्टरांचं नाव आहे. या घटनेनंतर बीडमध्ये अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. आता या नव्या माहितीने चर्चेला आणखी उधाण आलं आहे.

मृत डॉक्टर सुधाकर चोरमले आणि मेडिकल चालकांचा देवाण-घेवाणीवरुन जुना वाद होता. त्या रागातून डॉक्टरांनी असं केल्याचा संशय मेडिकल चालकाने व्यक्त केला आहे. डॉक्टरांनी आपल्याला रात्री एकच्या सुमारास दवाखान्यात बोलावून घेतलं. त्याआधीच डॉक्टर बनावट चावीच्या मदतीने मेडिकलमध्ये गेले होते. मी आलो तेव्हा अचानक स्फोट झाला, अशी माहिती संबंधित मेडिकल चालकाने दिली.

मेडिकल चालकाने डॉक्टरांवरच स्फोट घडवल्याचा आरोप केला असला तरी मग स्वतः डॉक्टरांचाच यात मृत्यू कसा झाला? त्यांनी स्फोट करताना स्वतःला वाचवण्याची व्यवस्था केली नाही का? मग यात मेडिकल चालक कसा वाचला? मेडिकल चालक दुकानात येण्याआधीच स्फोट कसा झाला असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला इतर काही कंगोर आहेत का असाही प्रश्न विचारला जात आहे.

या स्फोटात डॉक्टर दुकानाच्या बाहेर 15 फूट लांब फेकले गेले होते. तसेच बाहेर उभा असलेला कंपाऊंडर जखमी झाला होता. रात्री घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जागेचा पंचनामा केला. यावेळी त्यांना अनेक गोष्टी संशयास्पद आढळून आल्या आणि तपासाला सुरुवात झाली, अशी माहिती डीवायएसपी स्वप्निल राठोड यांनी दिली आहे.

दरम्यान, मंगळवारी (9 जून) गेवराई परिसरातील बागपिंपळगाव येथे मेडिकलमध्ये अचानक स्फोट झाला. या भीषण घटनेत शेजारील दवाखान्यातील डॉक्टरांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. मृत डॉक्टरांचा या मेडिकल शेजारीच श्री साई समर्थ हा दवाखाना आहे. अद्याप या स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या स्फोटाने मृत डॉक्टर तब्बल 15 फूट बाहेर फेकले गेल्याने इतक्या तीव्रतेचा स्फोट कशामुळे झाला हेही स्पष्ट होणं आवश्यक आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्रात वादळातील नुकसानग्रस्तांना एनडीआरएफपेक्षा अधिक पटीने मदत : अजित पवार

Monsoon Session | विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन महिनाभर लांबणीवर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Blast in Medical Store in Beed