शेवटचा रुग्ण बरा होत नाही तोपर्यंत कोरोनाविरुद्धची लढाई संपणार नाही: छगन भुजबळ

नाशिकच्या ठक्कर डोम येथे पुन्हा एकदा 350 बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. | Coronavirus Nashik

शेवटचा रुग्ण बरा होत नाही तोपर्यंत कोरोनाविरुद्धची लढाई संपणार नाही: छगन भुजबळ

नाशिक: ठक्कर डोम येथे 350 बेड्सच्या कोविड केअर सेंटरची पुनर्निमिती ही महानगरपालिका व क्रेडाई संस्थेने केलेली अत्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा असून शेवटचा रुग्ण जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत ही लढाई संपणार नाही, असे राज्याचे मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी म्हटले. (chhagan bhujbal on coronavirus situation in Nashik)

ते शनिवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. क्रेडाई संस्थेच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून इतर संस्थांनी देखील कोरोनाच्या या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बेड्सची संख्या अपुरी पडत आहे. त्यादृष्टीने नाशिक महानगरपालिका व क्रेडाई या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या ठक्कर डोम येथे पुन्हा एकदा 350 बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण छगन भुजबळ यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, माजी खासदार समीर भुजबळ, मनपा गटनेते सतीश सोनवणे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, मनपा उपायुक्त मनोज घोडे पाटील, मनपा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे,डॉ.राजेंद्र भंडारी यांच्यासह क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, उपाध्यक्ष कृणाल पाटील,रंजन ठाकरे, विष्णुपंत म्हैसधुणे, जितूभाई ठक्कर, सुरेश पाटील, गौरव ठक्कर, अनिल आहेर, सचिन बागड, मनोज खिवसरा, रंजन भलोडीया, राजेश आहेर, हंसराज देशमुख, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, सागर शहा, सतीश मोरे आदी उपस्थित होते.

‘रेमडेसिव्हिर लस काय आमच्या घरी तयार होत नाही’

कोरोना लसीच्या तुटवड्यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. अमूकच लस कशाला हवी? मिळेल ती लस घेऊन देशातील जनतेला द्या ना, लसीचा अट्टाहास करू नका. अरे, माणूस जगला पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले. तसेच रेमडेसिव्हिर लस काय आमच्या घरी तयार होत नाही, असं धक्कादायक विधानही त्यांनी केलं.

नाशिक येथे मीडियाशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. लंडनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्यांनी आपली माणसं जगवण्यासाठी मिळेल त्या लस घेतल्या. अमूकच लस हवी असा अट्टाहास केला नाही. लंडनच्या प्रशासनाने ती लस स्वदेशी आहे की विदेशी आहे हे काहीच पाहिलं नाही, असं सांगतानाच आपल्याकडेही लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. तरीही हीच लस घ्या, आपल्याच देशातील लस घ्या असा आग्रह केला जात आहे. अमूकच लस कशाला? अरे, माणूस जगला पाहिजे पहिला. हीच लस घ्या, तीच लस घ्या करू नका. जी लस उपलब्ध असेल ती नागरिकांना द्या, असं भुजबळ म्हणाले. झालं गेलं विसरून आता पुढे गेलं पाहिजे. पुन्हा जोमाने लसीकरण केलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

‘मनुष्यबळाची कमतरता, डॉक्टर व नर्सेसनी पुढे यावे’

देशात कोविडचा प्रादुर्भाव वाढला त्यावेळी नाशिकमध्ये ठक्कर डोमची व्यवस्था नाशिकमध्ये केली. मध्यंतरीच्या काळात कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ही व्यवस्था बंद केली होती. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा कार्यान्वित करावी लागत आहे.
त्यामुळे प्रादुर्भाव वाढत असून आपण उपाययोजना करत असताना मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आपण व्यवस्था करण्यात कमी पडत आहोत, ही परिस्थिती आहे. त्यामुळे या कामासाठी खाजगी डॉक्टर, नर्स, परिचारिका यांनी कामासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

(chhagan bhujbal on coronavirus situation in Nashik)