‘कोरोना’बाधिताचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवणार नाही, पुणे विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय

| Updated on: Apr 13, 2020 | 9:08 AM

'कोरोना'ग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात न देण्याचे सक्त आदेश पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. (Corona Patient Funeral instructions for Pune)

कोरोनाबाधिताचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवणार नाही, पुणे विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय
Follow us on

पुणे : पुणे विभागात ‘कोरोना’बाधिताचा रुग्णाचे निधन झाल्यास त्याचा मृतदेह कुटुंबीयांना दिला जाणार नाही, असा मोठा निर्णय पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी घेतला आहे. त्या मृतदेहावर गॅस किंवा विद्युतदाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येतील. (Corona Patient Funeral instructions for Pune)

आधीपासूनच ‘कोरोना’बाधिताच्या मृतदेहावर गॅस किंवा विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्याची स्पष्ट सूचना होती. परंतु रुग्णाच्या मोजक्या कुटुंबियांना यामध्ये सहभागी होण्याची मुभा होती. आता ‘कोरोना’ग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात न देण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत.

मृतदेह दफन करायचा असल्यास?

मृतदेह दफन करायचा असल्यास शहरापासून दूर अंतरावर सहा फूट खोल खड्डा खणावा लागेल. त्यामध्ये निर्जंतुक लिक्विड टाकून मृतदेह प्लास्टिकच्या दोन बॅगांमध्ये ठेवून दफन केला जाईल.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त दगावले आहेत. याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागातील सर्व जिल्हाप्रमुखांना कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराविषयी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

कोरोनाबाधित मृत व्यक्तीमुळे विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची मोठी शक्यता असते. कोरोनाबाधित मृतदेह हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट, सॅनिटायझर अशा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचनाही म्हैसेकर यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किमान 30 एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाऊन ठेवण्याची घोषणा केली. पुण्यात कोरोनाचं सावट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. इथे काल (12 एप्रिल) दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 31 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

जिल्ह्यात एकूण 240 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 19 जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. पुण्यात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर देशात सर्वाधिक आहे. पुण्याचा मृत्यूदर हा 11. 96% असून त्या तुलनेने जगाचा मृत्यूदर 5.97 टक्के आहे.