Chandrayaan | ‘संभाजी भिडेंची इस्रोच्या प्रमुखपदी निवड करा’

| Updated on: Sep 11, 2019 | 2:25 PM

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Chandrayaan | संभाजी भिडेंची इस्रोच्या प्रमुखपदी निवड करा
Follow us on

पुणे : आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी ते इस्रोच्या (ISRO) चंद्रयान मोहिमेवरुन (Chandrayaan) केलेल्या वक्तव्याने चांगलेच टीकेचे धनी ठरले. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने (NASA) एकादशीच्या दिवशी त्यांची चंद्र मोहिम केल्यानेच ती यशस्वी झाली, असा दावा त्यांनी केला होता. यानंतर आता संभाजी भिडेंची इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक करावी, अशी उपहासात्मक मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने (NSC) केली आहे.

पुणे राष्ट्रवादी (NCP) विद्यार्थी काँग्रेसने ही मागणी करणारे पत्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पाठवले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस परीक्षित तळोकार यांच्या नावे हे पत्र पाठवण्यात आलं.

मोदींना पाठवलेल्या या पत्रात म्हटले आहे, “सांगलीतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ संभाजी भिडे यांची तात्काळ इस्रोच्या प्रमुखपदी निवड करण्यात यावी. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांची ही नियुक्ती व्हावी. श्रीहरीकोटामधील सर्व सूत्रं त्यांच्या हातात दिल्यास ते पंचांग पाहून पुढील चंद्रयान मोहिमेचा कार्यक्रम ठरवतील. त्यांच्या या कामामुळे काही काळातच भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो अमेरिकेच्या नासाच्याही पुढे जाऊन अव्वल ठरेल.

संभाजी भिडे काय म्हणाले होते?


भारतीय कालमापन पद्धतीला जगात तोड नसून एक सेकंदांचा हजारावा भाग मोजण्याची पद्धत सुद्धा भारतीय कालपमापन पद्धतीमध्ये आहे. अमेरिकेने आतापर्यंत 38 वेळा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही. तेव्हा नासाच्या वैज्ञानिकाने भारतीय कालमापन पद्धतीचा अभ्यास केला आणि उपग्रह सोडला आणि तो यशस्वी झाला. अमेरिकेने एकादशी दिवशी उपग्रह सोडला कारण त्या दिवशी ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असते. त्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला, असा दावा संभाजी भिडे यांनी केला होता.