बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झाचा घटस्फोट

बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झाने घटस्फोट घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पाच वर्षांच्या संसारानंतर दीया पती साहिल संघापासून विभक्त होत आहे

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:11 PM, 1 Aug 2019
बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झाचा घटस्फोट

मुंबई : माजी ब्यूटी क्वीन, अभिनेत्री-मॉडेल दिया मिर्झा पतीपासून विभक्त झाली आहे. पाच वर्षांच्या संसारासह दीया आणि पती साहिल संघा अकरा वर्ष एकत्र होते. परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय दीयाने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.

18 ऑक्टोबर 2014 रोजी दीयाने साहिलसोबत लगीनगाठ बांधली. मात्र अवघ्या पाच वर्षांतच दोघांच्या नात्यात वितुष्ट आलं आहे. घटस्फोटानंतरही आपण मित्र राहू, असं दियाने म्हटलं आहे. मात्र घटस्फोटामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

‘गेली अकरा वर्ष एकत्र व्यतीत केल्यानंतर आम्ही परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही यापुढेही मित्र राहू. एकमेकांविषयी प्रेम आणि आदर कायम राहील. आमचे रस्ते कदाचित वेगवेगळे असतील, मात्र आमचे बंध तसेच असतील’ असं दियाने ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

 

‘प्रेम आणि समजूतदारपणाबद्दल आम्ही आमचे कुटुंबीय आणि मित्रांचे आभारी आहोत. आमच्या खाजगी आयुष्याचा आदर राखत पाठिंबा द्यावा. आम्ही यावर कोणतंही भाष्य करणार नाही’ असं दिया म्हणाली.

‘रहना है तेरे दिल में’मुळे लोकप्रियता

2000 साली दिया मिर्झाने मिस एशिया पॅसिफीक हा किताब जिंकला होता. ‘रहना है तेरे दिल में’ या पहिल्याच हिंदी चित्रपटामुळे दीया मिर्झा लोकप्रिय झाली. 37 वर्षीय दियाने त्यानंतर दीवानापन, तुमसा नहीं देखा, दम, तुमको ना भूल पायेंगे असे अनेक चित्रपट केले. नुकतीच ती संजू चित्रपटात मान्यता दत्तच्या भूमिकेत दिसली होती.

यापूर्वी हृतिक रोशन, अर्जुन रामपाल, फरहान अख्तर, कोंकणा सेन शर्मा, अरबाज खान-मलायका अरोरा यासारख्या प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांनी घटस्फोट घेतला आहे.