ग्राहकांची ‘दिवाळी’; काजू-बदामचे दर घसरल्याने सुकामेवा खरेदीसाठी बाजारात गर्दी!

| Updated on: Nov 14, 2020 | 6:41 PM

कोरोनाकाळात आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या ड्रायफ्रूट मार्केटमध्ये काजू आणि बदामाच्या दरात 50 टक्के घसरण झाल्याने यंदा दिवाळीत नागरिकांकडून मिठाईपेक्षा सुकामेव्याला अधिक पसंती मिळताना दिसत आहे. (Drop in prices of dry fruits bring cheer to Diwali shoppers)

ग्राहकांची दिवाळी; काजू-बदामचे दर घसरल्याने सुकामेवा खरेदीसाठी बाजारात गर्दी!
Follow us on

मुंबई: कोरोनाकाळात आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या ड्रायफ्रूट मार्केटमध्ये काजू आणि बदामाच्या दरात 50 टक्के घसरण झाल्याने यंदा दिवाळीत नागरिकांकडून मिठाईपेक्षा सुकामेव्याला अधिक पसंती मिळताना दिसत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दहा दिवसांमध्ये तब्बल 3700 टन सुकामेव्याची विक्री झाली असून तब्बल 2250 टन साखरेची आवक झाली आहे. त्याचबरोबर खजूर व खारीकच्या विक्रीमध्येही वाढ झालेली बघायला मिळत आहे. (Drop in prices of dry fruits bring cheer to Diwali shoppers)

मुंबई व नवी मुंबईकरांमध्ये मागील काही वर्षांपासून आरोग्याविषयी जागरूकता वाढत आहे. तसेच कोरोनाच्या सावटाखाली यंदा दिवाळी साजरी करावी लागणार आहे. कोरोना असल्यामुळे वारंवार लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात असून नागरिकही आरोग्याविषयी जागरूक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच यंदा दिवाळीत नागरिकांचा ओढा सुकामेव्याच्या खरेदीकडे असल्याचं दिसून येत आहे.

दिवाळी म्हटली की फराळ आणि मिठाई आलीच. परंतु, यंदा दिवाळीमध्ये मिठाईऐवजी सुकामेवा, खजूर, खारीक यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जात आहे. संपूर्ण राज्यासह गुजरातमध्ये मुंबईमधून सुकामेवा पाठवला जातो. सध्या जगभरातून मुंबईमध्ये सुकामेवा विक्रीसाठी येत असतो. मात्र शासनाच्या नियमांमुळे मुंबई व इतर ठिकाणी परस्पर माल जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजार समितीवर याचा परिणाम झाला आहे. दिवाळीनिमित्त मागील दहा दिवसांमध्ये तब्बल 3700 टन सुकामेव्याची विक्री झाली असून 1480 टन बदामची विक्री झाली आहे. तर खजूर, पिस्ता, खारीक, आक्रोड, व काजूची नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

मागील दोन महिन्यांपासून मुंबई बाजार समितीमध्ये सुकामेव्याचा बजार स्थिर असून गेल्या दहा दिवसांमध्ये सुकामेव्याच्या विक्रीतून जवळपास 140 कोटींची उलाढाल झाली असून एपीएमसीच्या बाहेरही कित्येक कोटी रुपयांची उलाढाल या व्यवसायातून झाली आहे. अनेक व्यावसायिक, कॉर्पोरेट कंपन्यांनी त्यांच्या येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेट देताना गोड मिठाईऐवजी सुकामेव्याला पसंती दिली आहे.

60 टक्के चायना वस्तूंची विक्री

दिवळीनिमित्त बाजारात आकर्षक लायटिंग्स व पणत्या आल्या आहेत. बाजारपेठेत विविध प्रकारचे आकाशकंदील लावण्यात आले असून यंदा नागरिकांनी चायनाच्या वस्तूंवर बहिष्कार करत भारतीय बनावटीच्या गोष्टी खरेदी करण्यावर भर दिला आहे. परंतु काही ठिकाणी गेल्या वर्षीच्या उरलेल्या चायनाच्या वस्तू विकण्यात येत आहेत. बाजारात सध्या 60 टक्के चायनाच्या गोष्टी विकल्या जात असून 40 टक्के भारतीय बनावटीच्या गोष्टी विकल्या जात आहेत. एकीकडे चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकल्याचे बोलले जात असला तरी अजूनही मोठ्या प्रमाणावर बाजारात चायनाच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

ड्रायफ्रुट्सचे दर घसरले

दिवाळी सण म्हटला की घरगुती स्वरुपाच्या वस्तू तयार करण्यासाठी गृहिणींकडून खरेदीसाठीचे नियोजन सुरु केले जाते. लाडू, शंकरपाळे, करंजी, चकली या व अशा इतर दर्जेदार वस्तू खरेदीसाठी ग्राहकांचा कल असतो. तसेच दिवाळीत ड्रायफ्रुटस मोठ्या प्रमाणात एकमेकांना भेट दिले जातात. यंदा ड्रायफ्रुट्सचे दर घसरले असून ड्रायफ्रुट्सचा राजा मानला जाणाऱ्या काजूचे दर हे ५० टक्क्यांनी खाली घसरले आहेत. यंदा काजू ४५० प्रतिकिलो दराने विकला जात असून मागील वर्षी काजूची किंमत ८०० रुपये प्रतिकिलो होती. तसेच बदाम व खजुराच्या किंमतीतही ३० ते ४० टक्क्यांची घसरण झाली आहे.

 

संबंधित बातम्या:

PHOTO | सीमेवरील जवानांसाठी दिवाळी फराळ; स्वयंसेवी संस्था पाठवणार 14 हजार लाडू!

शेतकऱ्यांना दिवाळी बोनस, सौभाग्यवतींना पैठणी आणि फराळ; गोधन डेअरीचं गिफ्ट

(Drop in prices of dry fruits bring cheer to Diwali shoppers)