ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीला परवानगी नाही, ठाकरे सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

| Updated on: Oct 24, 2020 | 11:46 AM

ईद ए मिलादच्या मिरवणुकीला परवानगी नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे.  (Eid Milad-un-Nabi Celebration Guidelines from Thackery government)   

ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीला परवानगी नाही, ठाकरे सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
Follow us on

मुंबई : येत्या 30 ऑक्टोबरला राज्यात ईद ए मिलाद साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनेनुसार इतर धार्मिक सणांप्रमाणे घरात राहूनच हा सण साजरा करावा, असे आवाहन करण्यात आलं आहे. तसेच ईद ए मिलादच्या मिरवणुकीला परवानगी नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे.  (Eid Milad-un-Nabi Celebration Guidelines from Thackery government)

ईद-ए-मिलादसाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) जुलूस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी येत्या 30 ऑक्टोबरला ईद ए मिलाद साजरी होणार आहे. राज्य शासनातर्फे सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्याने ईद ए मिलादच्या मिरवणुकीला परवानगी देता येणार नाही. पण प्रतिकात्मक स्वरुपात खिलाफत हाऊस, मुंबई येथील मिरवणुकीला एका ट्रकसह 10 जणांना परवानगी देण्यात आली आहे.

तसेच खिलाफत हाऊस या ठिकाणी शासनांच्या नियमांचे पालन करुन 5 जणांना धार्मिक प्रवचन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या प्रवचनाचा कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करत ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावा. त्याचे केबल टीव्ही, फेसबुक इत्यादी माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात यावे.

कंटेन्मेंट झोनमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध कायम ठेवण्यात आले असून त्यात कोणतीही शिथीलता देण्यात आलेली नाही.

मिरवणुकीच्या स्वागतासाठी पंडाल बांधण्यासाठी नियमांचे पालन करावे. त्या ठिकाणी एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती नसावी, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

ईद-ए- मिलाद निमित्त मुस्लिम वस्तीत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणार्थ पाण्याचे तात्पुरते सबील (पाणपोई) लावण्यात येतात. या बांधण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती नसावी. तसेच या ठिकाणी सीलबंद पाण्याच्या बाटलींचे वाटप करावे. त्या ठिकाणी स्वच्छता राखावी.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. सोसायटीमधील नागरिकांनी एकत्रित जमत सण साजरा करु नये. रक्तदान शिबीर किंवा आरोग्य शिबीर असे उपक्रम राबवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  (Eid Milad-un-Nabi Celebration Guidelines from Thackery government)

संबंधित बातम्या : 

तुमच्या खात्यात परत येतील पैसे, कर्जाच्या व्याज सवलती संदर्भात सरकारकडून गाइडलाईन्स जारी

Coronavirus Vaccine: पुढच्या वर्षी जूनपर्यंत येणार कोरोनाची देशी लस, भारत बायोटेकचा दावा