शेतकऱ्यांना सोमवारपासून भरपाई, लोकलबाबत रेल्वेला पत्र, मंदिरांचा निर्णय दिवाळीनंतर : वडेट्टीवार

| Updated on: Nov 05, 2020 | 6:18 PM

राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत राज्य सरकार दिवाळीनंतर निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. | Vijay Wadettiwar

शेतकऱ्यांना सोमवारपासून भरपाई, लोकलबाबत रेल्वेला पत्र, मंदिरांचा निर्णय दिवाळीनंतर : वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून नुकसानभरपाईचे पैसे मिळायला सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. पदवीधर शिक्षक मंडळाच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना मदत देण्यात अडथळा येत होता. मात्र, राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात आज पत्र पाठवले आहे. उद्यापर्यंत त्यांच्याकडून मदतीचे वाटप करण्यासाठी परवनागी मिळेल. त्यामुळे सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खातात पैसे वळते व्हायला सुरुवात होईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. (Maharshtra Farmers affected due to heavy rain will get compensation from next week)

ते गुरुवारी मुंबईत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आता रब्बी पिकांसाठी पेरणी करायची असल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. यापूर्वीही निवडणूक आचारसंहितेच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्यात आली होती. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या रक्कमेचे वाटप करण्यात कोणताही अडथळा येणार नाही, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

तसेच राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत राज्य सरकार दिवाळीनंतर निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. दिल्लीत सध्या दिवसाला कोरोनाचे सहा हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात काळजी घेण्याची गरज आहे. भाजपने संतांची वाणी ऐकली नाही का? देव देवळात नव्हे तर माणसात असतो. गोव्यातही अजून मंदिरं सुरु झालेली नाहीत. तिथे कोणाचं सरकार आहे. त्यामुळे भाजप मंदिरांच्या मुद्द्यावरुन केवळ राजकारण करत असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. तर मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यावरुन राजकारण सुरु असल्याने याबाबतचा निर्णय रखडल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.

‘राज्य सरकार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, पण केंद्राचे पथक महाराष्ट्रात फिरकलेच नाही’

काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या मुद्यावरुन आक्रमक झालेले भाजप नेते केंद्र सरकारच्या मदतीसंदर्भात शांत का आहेत, असा सवालही वडेट्टीवार यांनी बुधवारी उपस्थित केला होता. महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. आज 18 दिवस उलटूनही केंद्र सरकारचे पाहणी पथक राज्यात फिरकलेले नाही. विरोधक यावर चकार शब्दही बोलत नाहीत, नक्की काय गौडबंगाल आहे? कुठे गेले केंद्राचे पथक आणि कुठे गेले विरोधक?, असे वडेट्टीवार यांनी विचारले. तसेच या प्रश्नावर विरोधकांनी मोठा आवाज नको पण किमान पोपटासारखा आवाज तरी काढावा, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

‘मातोश्री’वर आलेला ‘तो’ शेतकरी मदतीसाठी कृषीमंत्र्यांकडे, 8 दिवसात चौकशी करा, कृषीमंत्र्यांचे आदेश

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राचे पथक अजूनही आलेच नाही, आता विरोधक गप्प का?: विजय वडेट्टीवार

(Maharshtra Farmers affected due to heavy rain will get compensation from next week)