मोदीजी, बिल्डर आम्हाला धमकावतोय, मदत करा, सायरा बानूंची विनंती

मोदीजी, बिल्डर आम्हाला धमकावतोय, मदत करा, सायरा बानूंची विनंती

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीचे ‘ट्रॅजेडी किंग’ अर्थात अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नीने म्हणजेच सायरा बानू यांनी भूमाफिया समीर भोजवानी यांच्या त्रासाला कंटाळून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. भूमाफिया समीर भोजवानी तुरुंगातून सुटला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतरही त्याच्यावर कारवाई केली जात नसल्याची तक्रार सायरा बानू यांनी केली आहे. अभिनेते दिलीप कुमार यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन सायरा बानू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान कार्यालयाला टॅग करुन ही विनंती केली आहे.

सायरा बानो यांनी नेमकी काय विनंती केली आहे?

“आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर आणि पंतप्रधान कार्यालय, भूमाफिया समीर भोजवानी तुरुंगातून सुटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतरही त्याच्यावर कारवाई केली जात नाहीय.

समीर भोजवानीकडून दिलीप कुमार यांना धमक्या दिल्या जात आहेत, पैसा आणि बळाचा वापर करुन घाबरवलं जात आहे.

तुम्ही आमची मुंबईत भेट घ्यावी, अशी विनंती करते आहे.”

एकंदरीत, सायरा बानूंनी त्यांच्या ट्वीटमधून समीर भोजवानीबाबत प्रचंड भीती व्यक्त केली आहे.

हे नेमके प्रकरण काय आहे?

दिलीप कुमार आणि सायरा बानू यांचा मुंबईतील पाली हिल्स भागात बंगला आहे. या बंगल्याच्या जागेवर समीर भोजवानीने दावा केला आहे. भोजवानी याने धमकावून या जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. याआधीही सायरा बानू यांनी भोजवानीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर जानेवारी महिनयात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समीर भोजवानीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, एप्रिलमध्ये त्याला अटकही केली होती.

आता सायरा बानू यांच्या म्हणण्यानुसार, समीर भोजवानी तुरुंगातून बाहेर आला आहे. हेच ध्यानात घेऊन सायरा बानू यांनी ट्वीट करुन, आपली भीती थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलून दाखवली आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील ‘महानायक’ दिलीप कुमार यांनाच सुरक्षितता वाटत नसेल, तर सर्वसामान्यांना काय सुरक्षित वाटणार? अशा प्रतिक्रिया आता सायरा बानू यांच्या ट्वीटखाली नेटिझन्सने देण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून, दिलीप कुमार आणि सायरा बानू यांना मदत करावी, अशा विनंत्याही नेटिझन्स आणि सर्वच स्तरातील लोकांकडून केल्या जात आहेत.

Published On - 12:33 pm, Mon, 17 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI