जालन्यातील मुलीवर मुंबईत अमानुष अत्याचार, चौघांकडून सामूहिक बलात्कार

मुंबईतील चुनाभट्टी पोलीस अधिक तपास करणार आहेत. पण बलात्कार पीडित मुलीची (Jalna Girl rape) प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती समोर येत आहे. पीडित मुलगी सध्या औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात (घाटी) उपचार घेत आहे.

जालन्यातील मुलीवर मुंबईत अमानुष अत्याचार, चौघांकडून सामूहिक बलात्कार

औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील एका मुलीवर मुंबईत चार जणांकडून सामूहिक बलात्कार (Jalna Girl rape) करण्यात आलाय. याबाबत औरंगाबादच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईतील चुनाभट्टी पोलीस अधिक तपास करणार आहेत. पण बलात्कार पीडित मुलीची (Jalna Girl rape) प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती समोर येत आहे. पीडित मुलगी सध्या औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात (घाटी) उपचार घेत आहे.

अगदी काही दिवसांपूर्वी आपल्या भावाला भेटायला मुंबईत गेलेल्या या मुलीवर चार नराधमांनी पाशवी बलात्कार केला. ही तरुणी मरणप्राय यातना भोगत आहे. चार जणांनी केलेल्या पाशवी बलात्कारानंतर या मुलीचा कमरेपासून खालचा भाग पूर्णतः निकामी झालाय. तिला सातत्याने वेडाचे झटके येत आहेत. ती शुद्धीवर आल्यानंतर जोरजोरात ओरडू लागते. अत्यंत अमानवी पद्धतीने अत्याचार या मुलीवर करण्यात आले आहेत.

पीडित मुलगी ही मूळची जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रहिवासी आहे. पीडित महिलेचा भाऊ हा मुंबईतल्या चेंबूर परिसरात राहत होता. भावाच्या मुलाला सांभाळण्यासाठी ती मुंबईत आली होती. 7 जुलैला भावाच्या मुलाला ताप आला म्हणून त्याला एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यादिवशी पीडित मुलगी घरी एकटीच होती. यावेळी तिला कुणीतरी फोन करून बाहेर बोलावून घेतलं आणि गुंगीचं औषध देऊन चार जणांनी बलात्कार केला.

भेदरलेल्या पीडितेने हा प्रकार घडल्यानंतर घरी काहीच सांगितलं नाही. होणाऱ्या वेदना सहन करत ती तशीच झोपून राहिली. दोन दिवसानंतर तिचे पाय लुळे पडू लागले. त्यामुळे तिला अर्धांगवायू झाला असावा असं समजून कुटुंबाने उपचार सुरू केले. मात्र डॉक्टरांनी हा प्रकार अर्धांगवायूचा नसून वेगळं काहीतरी झालंय, मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असं सांगितलं. तेव्हा मुलीच्या वडिलांनी मुलीला औरंगबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केलं. पण इथल्या डॉक्टरांनी तपासणी करून मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं सांगितलं.

हा प्रकार ऐकून वडिलांनी मुलीकडे विचारपूस केली. तेव्हा चार जणांनी काहीतरी पाजवून आपल्यावर बलात्कार केल्याचं तिने सांगितलं. मुलीने हा प्रकार सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलाय. हाच गुन्हा आता मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलाय. मात्र अजूनही अज्ञात आरोपींचा पोलिसांना शोध लागलेला नाही. एका मुलीवर इतका पाशवी बलात्कार करणाऱ्या या आरोपींच्या मुसक्या कधी आवळल्या जातील हा प्रश्न आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI