देशातील 23 राज्यांच्या 47 जिल्ह्यांमध्ये 28 दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण नाही : आरोग्य मंत्रालय

| Updated on: Apr 19, 2020 | 12:24 PM

देशातील एकूण 731 जिल्ह्यांपैकी 47 जिल्ह्यांमध्ये मागील 28 दिवसांमध्ये कोरोनाचा (कोविड-19) एकही रुग्ण आढळलेला नाही (Lockdown and corona cases in India).

देशातील 23 राज्यांच्या 47 जिल्ह्यांमध्ये 28 दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण नाही : आरोग्य मंत्रालय
Follow us on

नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, दुसरीकडे देशातील एकूण 731 जिल्ह्यांपैकी 47 जिल्ह्यांमध्ये मागील 28 दिवसांमध्ये कोरोनाचा (कोविड-19) एकही रुग्ण आढळलेला नाही (Lockdown and corona cases in India). केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेच ही माहिती दिली. हे 47 जिल्हे देशातील 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

मागील 28 दिवसांमध्ये एकही कोरोना रुग्ण न सापडलेल्या 47 जिल्ह्यांव्यतिरिक्त 22 जिल्हे असेही आहेत जेथे मागील 14 दिवसांमध्ये एकही कोरोना प्रकरणाची नोंद नाही. आरोग्य मंत्रालयाने सांगितलं, “देशातील 12 राज्यांमधील 22 जिल्ह्यांमध्ये मागील 14 दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. केंद्र सरकार वाढलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 20 एप्रिलपासून कोरोनाचा संसर्ग नसलेल्या अथवा कमी असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंधांवर काही प्रमाणात सूट देणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा आढावा घेतला जात आहे. याआधी अशाच प्रकारे केरळने लॉकडाऊन शिथिल केला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने होणारा मृत्यूदर 3.3 टक्के आहे. यात बरं होणाऱ्यांचं प्रमाण 13.83 टक्के आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 75 टक्के लोक 60 वर्षांहून अधिक वय असलेले आहेत. 42 टक्के मृतांचे वय 75 वर्षांहून अधिक आहे. देशभरात 18 एप्रिलपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाचा आकडा एकूण 14,792 पर्यंत पोहचला आहे. सध्या देशात 12,289 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

देशात आतापर्यंत कोरोनामुळे 488 नागरिकांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशातील 488 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वात अधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूने 201 नागरिकांचे बळी घेतले आहेत. यानंतर मध्य प्रदेशचा दुसरा क्रमांक लागतो. तेथे आतापर्यंत कोरोनामुळे 69 नागरिकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 2014 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढून 3,323 झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे. दिल्लीत 1,707 नागरिक संक्रमित आहेत. मध्य प्रदेशमध्ये 1 हजार 355, तामिलनाडूमध्ये 1,323 आणि राजस्थानमध्ये 1,267 लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.

संबंधित बातम्या :

देशभरात 1992 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 14,378 वर, 29.8 टक्के रुग्ण तब्लिगींशी संबंधित

Corona Update | कोरोना रुग्णांचं प्रमाण 40 टक्क्यांनी घटलं, 80 टक्के रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा

कोरोनाला रोखण्याठी केवळ लॉकडाऊन उपाय नाही, टेस्टिंग वाढवा : राहुल गांधी

Lockdown and corona cases in India