संपूर्ण घटानाक्रम : प्रेमविवाह केल्याचा राग, भावाने बहिणीसमोर तिच्या नवऱ्याला संपवलं!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

बीड : बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरुन, भावाने बहिणीच्या नवऱ्याला तिच्या डोळ्यांदेखत भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करत संपवलं. बीड जिल्ह्यातील गांधी नगरातील या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. सुमीत वाघमारे असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर मारेकरी बालाजी लांडगे फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. संपूर्ण घटना काय आहे? जीवाचा आकांत […]

संपूर्ण घटानाक्रम : प्रेमविवाह केल्याचा राग, भावाने बहिणीसमोर तिच्या नवऱ्याला संपवलं!
Follow us on

बीड : बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरुन, भावाने बहिणीच्या नवऱ्याला तिच्या डोळ्यांदेखत भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करत संपवलं. बीड जिल्ह्यातील गांधी नगरातील या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. सुमीत वाघमारे असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर मारेकरी बालाजी लांडगे फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

संपूर्ण घटना काय आहे?

जीवाचा आकांत करुन पतीला वाचवा म्हणून आर्त हाक देणाऱ्या या नवविवाहितेचे हे दृश्य पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील. ही दृश्य तुम्हाला विचलित करतील. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीच्या बाजूला बसलेल्या भाग्यश्री लांडगेचा आक्रोश ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा आणणारा आहे.

भाग्यश्री लांडगे आणि सुमित वाघमारे हे दोघेजण बीडच्या आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. दोघांची घट्ट मैत्री जमली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ घेऊन या दोघांनी लग्न केलं. मात्र, हे लग्न भाग्यश्रीच्या कुटुंबीयांना खटकलं. दोन महिन्यांपासून या प्रेमी जोडप्याचा शोध सुरु होता आणि  कालचा दिवस त्यांच्यासाठी काळ बनून आला. भाग्यश्रीच्या भावाने म्हणजे बालाजी लांडगेने मित्रांच्या मदतीने सुमित वाघमारेची भररस्त्यात धारदार शस्त्राने हत्या केली.

काल सुमित आणि भाग्यश्रीची परीक्षा होती. पेपर संपवून ते संध्याकाळी पाच वाजता आदित्य महाविद्यालयाच्या बाहेर पडले. मात्र, तिथेच भाग्यश्रीचा भाऊ आणि त्याचे दोन मित्र काळ बनून बसले होते. याची पुसटशी कल्पना सुद्धा भाग्यश्री आणि सुमितला नव्हती. महाविद्यालयाच्या बाहेरच अचानक हल्ला झाला आणि यात सुमित गंभीर जखमी झाला. सुमित रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना, पत्नी भाग्यश्री मोठ्या आकांतेने पतीला वाचावा म्हणून आक्रोश करत होती, गयावया करत होती. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या एकाचेही काळीज पाझरले नाही. इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या संवेदना मेलेल्या होत्या. याउलट निर्लज्जपणे डोळ्यांनी पाहत ती घटना मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होते. शेवटी एक रिक्षाचालक पुढे आला आणि सुमितला रिक्षात टाकून बीडच्या जिल्हा रुग्णालयात नेण्याचं धाडस केलं. मात्र रस्त्यातच सुमितची प्राणज्योत मालवली.

आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाहेरच हे हत्याकांड घडलं. जेव्हा सुमितवर हल्ला झाला, तेव्हा त्याला वाचवण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही, एवढेच नव्हे, तर आदित्य महाविद्यालयाच्या वॉचमनने महाविद्यालयाचे गेट बंद केल्याचा आरोप सुमितच्या नातेवाईकांनी केला आहे.

या घटनेनंतर बीड पोलीस काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत मात्र हे सर्व मारेकरी तेथून पसार झाले होते. मारेकऱ्यांना अटक करा, यासाठी मध्यरात्रीपर्यंत बीडच्या शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक मार्गावर असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिस उपाधीक्षक सुधीर खेडकर यांनी सांगितले.

दुर्दैवी सुमितबद्दल माहिती

सुमीत वाघमारे बीड येथील आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनिअरिंगला शिकत होता. भाग्यश्रीही त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. दीड महिन्यांपूर्वी सुमित आणि भाग्यश्रीने कोर्ट मॅरेज केलं होतं. सुमित अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा मुलगा होता. माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे एक रुम भाड्याने घेऊन दोघेही राहत होते. भाग्यश्रीच्या घरी श्रीमंती, तर सुमितच्या घरची स्थिती हालाखीची होती.