पराभवाने खचलेल्या टीम इंडियासाठी पंतप्रधान मोदींचा मेसेज

| Updated on: Jul 10, 2019 | 11:38 PM

टीम इंडियाच्या पराभवावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रतिक्रिया दिली. हा परिणाम निराशाजनक आहे, मात्र अखेरपर्यंत टीम इंडियाने जी झुंज दिली, ते पाहून बरं वाटलं, असं मोदी म्हणाले.

पराभवाने खचलेल्या टीम इंडियासाठी पंतप्रधान मोदींचा मेसेज
Follow us on

मुंबई : आयसीसी विश्वचषक 2019 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारतावर 18 धावांनी मात केली आणि फायनलचं तिकीट मिळवलं. या पराभवाने संघासोबतच देशातील प्रत्येक क्रिकेट चाहता दु:खी झाला आहे. टीम इंडियाच्या पराभवावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रतिक्रिया दिली. हा परिणाम निराशाजनक आहे, मात्र, अखेरपर्यंत टीम इंडियाने जी झुंज दिली, ते पाहून बरं वाटलं, असं मोदी म्हणाले.

“हा परिणाम निराशाजनक आहे. मात्र, अखेरपर्यंत टीम इंडियाने जी झुंज दिली, ते पाहून बरं वाटलं. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये तुम्ही चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, याबाबत आम्हाला तुमच्यावर अभिमान आहे. विजय आणि पराजय हा जीवनाचा भाग आहे. टीमला त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा”, असं ट्वीट मोदींनी केलं.

काँग्रेसचे नेते राहुल गांधींनीही टीम इंडियासाठी ट्वीट केलं. “आजच्या रात्री करोडो भारतीयांची मनं दुखावल्या गेली असतील. मात्र, टीम इंडिया, तुम्ही चांगला प्रयत्न केला. तुम्हाला प्रेम आणि आदर मिळायला हवा”, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं. त्यासोबतच राहुल गांधींनी न्यूझीलंडला त्यांच्या विजयाबाबत शुभेच्छाही दिल्या.

“आम्ही विजयात आणि पराभवात तुमच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. तुम्ही आज अत्यंत चांगले खेळले, तुम्ही चांगली लढत दिली आणि देशाला तुमच्यावर अभिमान आहे”, असं ट्वीट काँग्रेसच्या आधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं.

ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर काल (9 जुलै) न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारतीय गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणले. मात्र, पावसाने या सामन्यात खोळंबा घातला आणि सामना त्या दिवसापूरता रद्द करावा लागला. त्यानंतर आज पुन्हा हा सामना खेळवण्यात आला. तेव्हा न्यूझीलंडने भारतासमोर 240 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र, सोपं वाटतं असलेलं हे आव्हान भारतीय संघाला पेललं नाही.

सुरुवातीलाच भारतीय फलंदाजीचं कंबरडं मोडलं. सुरुवातीच्या 5 धावांमध्ये महत्त्वाचे फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल प्रत्येकी 1-1-1 धावा करुन बाद झाले. भारताच्या फलंदाजीची सर्वात मजबूत फळी माघारी परतल्यानंतर रिषभ पंत (32) आणि हार्दिक पंड्या (32) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यानंतर रवींद्र जाडेजाने 59 चेंडूत 77 धावांची खेळी करत भारताच्या फायनलच्या अपेक्षा जीवंत ठेवल्या. पण ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर जाडेजा बाद झाला. जाडेजानंतर सर्व जबाबदारी धोनीवर आली. पण जलद धावा काढण्याच्या प्रयत्नात धोनीही धावबाद झाला आणि भारताच्या अपेक्षा मावळल्या. या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 18 धावांनी मात केली.

संबंधित बातम्या :

हार्दिक पंड्याची विकेट पडताच रोहित शर्माच्या डोळ्यात पाणी

जगातला सर्वोत्कृष्ट फिनिशर धावबाद, 130 कोटी भारतीयांच्या अपेक्षा मावळल्या

जाडेजाने 130 कोटी भारतीयांच्या अपेक्षा जागवल्या, पण भीती होती तेच झालं!

जाडेजा-धोनीची झुंज अपयशी, सेमीफायनलमध्ये भारताचा 18 धावांनी पराभव