जगातला सर्वोत्कृष्ट फिनिशर धावबाद, 130 कोटी भारतीयांच्या अपेक्षा मावळल्या

धोनी खेळपट्टीवर असल्यामुळे विजयाची अपेक्षा अजूनही मावळलेली नव्हती. पण मार्टिन गप्टिलने फेकलेला चेंडू थेट स्टम्पवर लागला आणि भारताची अपेक्षा मावळली.

जगातला सर्वोत्कृष्ट फिनिशर धावबाद, 130 कोटी भारतीयांच्या अपेक्षा मावळल्या

लंडन : महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जाडेजा यांच्या शतकी भागीदारीनंतरही भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यासोबतच या विश्वचषकातील भारतीय संघाचा प्रवासही इथेच संपला. विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारतावर 18 धावांनी मात केली आणि फायनलचं तिकीट मिळवलं. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील (दुसरा सेमीफायनल) विजेत्या संघासोबत न्यूझीलंडची फायनलमध्ये लढत रंगणार आहे. 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला सर्वबाद 221 धावांपर्यंत मजल मारता आली.

धोनी खेळपट्टीवर असल्यामुळे विजयाची अपेक्षा अजूनही मावळलेली नव्हती. पण मार्टिन गप्टिलने फेकलेला चेंडू थेट स्टम्पवर लागला आणि भारताची अपेक्षा मावळली. कारण, पहिल्या चेंडूवर धोनीने षटकार ठोकल्यानंतर सेलिब्रेशन झालं, पण दुसऱ्याच चेंडूवर दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. धोनी हा भारतीय संघाचा शेवटचा आशेचा किरण होता. धोनी बाद झाल्यानंतर अवघ्या काही धावात भारतीय संघ ऑल आऊट झाला.

धोनी आणि जाडेजा यांच्यात 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली. जाडेजा मोठे फटकार मारत होता, तर धोनी विकेट टिकवून स्ट्राईक रोटेट करत होता. पण जाडेजा बाद झाल्यानंतर धोनीवर जबाबदारी आली. धोनीने त्याचा नैसर्गिक खेळ दाखवण्यास सुरुवात करताच तो धावबाद झाला. धोनी अखेरच्या षटकापर्यंत मैदानात असताना भारताने अत्यंत महत्त्वाचे सामने जिंकले आहेत. पण धावबाद झाल्यामुळे भारताच्या आशा मावळल्या.

जाडेजाची टिच्चून फलंदाजी

रवींद्र जाडेजाने विश्वचषकाच्या नॉकआऊट सामन्यात आठव्या क्रमांकावर येऊन अर्धशतक ठोकत नवा विक्रम नावावर केलाय. न्यूझीलंडविरुद्ध त्याने 59 धावांची खेळी केली. याला 4 चौकार आणि 4 षटकारांचा साज होता. जाडेजा फलंदाजीसाठी आला तेव्हा भारताची अवस्था 6 बाद 92 धावा अशी होती.

न्यूझीलंडविरुद्ध यापूर्वीही अर्धशतक

ऑकलंडमध्ये पाच वर्षांपूर्वी आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना जाडेजाने 45 चेंडूत 66 धावांची खेळी केली होती. या सामन्यात भारतीय संघ 315 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता. विजयासाठी 86 चेंडूत 136 धावांची आवश्यकता असताना जाडेजा मैदानात आला. या सामन्यात आर अश्विननेही चांगली फलंदाजी केली आणि हा सामना टाय झाला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI