काश्मीर खोऱ्यात 60 पाकिस्तानी दहशतवाद्यांची घुसखोरी, मोदींच्या भाषणाआधी हल्ल्याचं कारस्थान

| Updated on: Sep 22, 2019 | 9:46 AM

मागील एका महिन्यात काश्मीर खोऱ्यात (Kashmir Vally) जवळपास 60 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी (Terrorist infiltration) केल्याची माहिती समोर आली आहे.

काश्मीर खोऱ्यात 60 पाकिस्तानी दहशतवाद्यांची घुसखोरी, मोदींच्या भाषणाआधी हल्ल्याचं कारस्थान
Follow us on

नवी दिल्ली: मागील एका महिन्यात काश्मीर खोऱ्यात (Kashmir Vally) जवळपास 60 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी (Terrorist infiltration) केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे (Jammu Kashmir) पोलीस महासंचालक (DGP) दिलबाग सिंह यांनी स्थानिक नागरिकांचा दहशतवादी संघटनांमध्ये होणारा सहभाग सध्या सर्वात कमी असल्याचा दावा केला आहे. मागील 45 दिवसांमध्ये केवळ 2 लोक दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं.

एका अधिकाऱ्याने सांगितलं, “सैन्य आणि सीमा सुरक्षा दलासह (BSF) इतर अनेक संस्थांच्या माहितीच्या आधारे संबंधित परदेशी दहशतवाद्यांची संख्या समोर आली आहे. श्रीनगर आणि अन्य क्षेत्रांमध्ये दहशतवाद्यांचा वावर सुरक्षा दलांसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. श्रीनगरमधील दहशतवाद्यांनी स्थानिक लोकांना धमकावण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचीही माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

‘द हिंदू’ला एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी संघटनांचे स्थानिक सदस्य पाकिस्तानमधील सहकाऱ्यांना कॉल करण्यासाठी पंजाबला जात होते. कारण काश्मीर खोऱ्यात आणि नियंत्रण रेषेच्या परिसरात (LOC) मोबाइल फोन सेवा बंद आहे.

पंतप्रधान मोदींच्या भाषणाआधी हल्ल्याची शक्यता

संबंधित अधिकाऱ्याने सांगितले, ‘आम्ही काही फोन कॉल इंटरसेप्ट केले आहेत. ते पंजाबमधून पाकिस्तानमधील हस्तकांना करण्यात आले. त्यानुसार सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पाकिस्तानकडून शक्य तेवढ्या अधिक दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. हे दहशतवादी 27 सप्टेंबरआधी मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न करु शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत बोलण्याच्या वेळी संदेश देण्यासाठी ते हे कृत्य करण्याचा विचार करत आहेत.