पंचगंगेचं पाणी महामार्गापर्यंत पोहोचलं, तर सांगलीत कृष्णा नदीपात्रात 15 बोटी तैनात

पंचगंगा नदीचं पाणी प्रमुख रस्त्यांवर यायला सुरुवात झाली आहे. शिरोली गावाजवळ पुणे-बंगळुरु महामार्गाचा सर्व्हिस रोड पोलिसांनी बंद केला.

पंचगंगेचं पाणी महामार्गापर्यंत पोहोचलं, तर सांगलीत कृष्णा नदीपात्रात 15 बोटी तैनात
| Updated on: Aug 07, 2020 | 10:57 AM

कोल्हापूर : पंचगंगेची पाणीपातळी 44 फूट 6 इंचावर गेल्याने कोल्हापूरवासियांची धाकधूक वाढत चालली आहे. पुणे-बंगळुरु महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर पाच ते सहा फूट पाणी साचलं आहे. (Kolhapur Rain Panchganga River Sangli Rain Live Updates)

पंचगंगा नदीचं पाणी प्रमुख रस्त्यांवर यायला सुरुवात झाली आहे. शिरोली गावाजवळ पुणे-बंगळुरु महामार्गाचा सर्व्हिस रोड पोलिसांनी बंद केला. पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक मात्र सुरळीत सुरु आहे.

पंचगंगेची पाणीपातळी वाढल्यानंतर राधानगरी धरणाचे आणखी दोन स्वयंचलित दरवाजे मध्यरात्री उघडले. एकूण चार दरवाजांमधून 7 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून धोका पातळी 43 फूट आहे. पंचगंगा नदीने काल (6 ऑगस्ट) सकाळी इशारा पातळी ओलांडली, तर संध्याकाळी धोक्याची पातळीही ओलांडली. आता तर पंचगंगेची पाणीपातळी 44 फूट 6 इंचावर गेली आहे.

कोल्हापूर शहर परिसरात पावसाची संततधार सुरु आहे, तर धरण क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. पावसाचा जोर काहीसा कमी आला असला, तरी धरणांमधून विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने पुराचा धोका मात्र कायम आहे.

पंचगंगा नदीकाठच्या गावांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 102 बंधारे पाण्याखाली गेले असून 100 हून अधिक गावांचा अंशतः संपर्क तुटला आहे. एनडीआरएफच्या चार तुकड्या कोल्हापूर  जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहेत.

सांगलीत कृष्णा नदीपात्रात 15 यांत्रिक बोटी

दुसरीकडे, सांगली जिल्ह्यातील वारणा धरण 84.44 टक्के भरलं. वारणा धरण परिसरात सलग चार दिवस अतिवृष्टी झाली. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. मात्र सकाळी कृष्णा नदीची पाणी पातळी 5 इंचाने कमी झाली. सांगलीजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फूट 7 इंच इतकी झाली आहे.

खबरदारी म्हणून सांगली जिल्हा परीषदेच्या 15 यांत्रिक बोटी कृष्णा नदी पात्रात दाखल झाल्या. संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज आहे. या बोटी नदी काठच्या गावांना दिल्या जाणार. त्याआधी नदी पात्रात या बोटींची प्रात्याक्षिके घेतली जाणार आहेत.

महापुराच्या कटू आठवणी ताज्या

कोल्हापूरवासियांच्या मनात पुन्हा गेल्या वर्षीच्या पाऊस आणि महापुराच्या कटू आठवणी दाटून आल्या आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर जिल्ह्याने न भूतो न भविष्यती असा महापूर अनुभवला. महापुरात अनेकांचे बळी गेले, तर हजारो घरं उद्ध्वस्त झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. कोट्यावधी रुपयांचं नुकसान करुन गेलेल्या या महापुराच्या आठवणीनेच नदीकाठच्या गावातील लोक शहारतात.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

गेल्या वर्षीचा अनुभव पाहता या वर्षी पाच महिने आधीपासूनच जिल्हा प्रशासनाने संभाव्य महापुराची तयारी केली. गेल्या वर्षीचा महापुराचा सर्वाधिक फटका करवीर तालुक्यातील आंबेवाडी आणि चिखली या गावांना बसला. त्यामुळे यावर्षी पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठताच ग्रामस्थाने स्थलांतराला सुरुवात केली.

(Kolhapur Rain Panchganga River Sangli Rain Live Updates)