पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर होण्याची भीती

पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर होण्याची भीती

गेल्या चार दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात धुंवाधार पाऊस असल्याने कोल्हापूर-गारगोटी, कोल्हापूर-राधानगरी, आंबोली-आजरा, गगनबावडा-जंगमवाडी या प्रमुख मार्गावरील वाहतूक बंद झाली.

अनिश बेंद्रे

|

Aug 06, 2020 | 5:29 PM

कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे आहेत. पंचगंगेची पाणी पातळी 43 फुटावर पोहोचली आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात पाणी घुसायला सुरुवात झाली आहे. (Kolhapur Panchganga River crosses Danger level)

गेल्या चार दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात धुंवाधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा महापुराच्या सावटाखाली आला आहे. जिल्ह्यातील 9 राज्य आणि 26 जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करावे लागले आहेत. कोल्हापूर-गारगोटी, कोल्हापूर-राधानगरी, आंबोली-आजरा, गगनबावडा-जंगमवाडी या प्रमुख मार्गावरील वाहतूक बंद झाली.

पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून धोका पातळी 43 फूट आहे. पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या परिसरात नदीचं पाणी घुसायला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती गंभीर होण्याची भीती वर्तवली जात आहे.

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर बरसणाऱ्या दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. पंचगंगा नदीची पाणीपातळी अवघ्या 24 तासात वीस फुटांनी वाढली.

पंचगंगा नदीने आज सकाळीच इशारा पातळी ओलांडली होती. पावसाचा जोर पाहता पंचगंगा यंदाही धोक्याची पातळी ओलांडणार, अशी भीती आधीपासूनच व्यक्त केली जात होती. पावसाचा जोर दिवसभरात काहीसा कमी आला असला, तरी धरणांमधून विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने पुराचा धोका मात्र कायम आहे.

राधानगरीचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार

राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून त्याचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील महापुराचा धोका कायम आहे. याच पार्श्वभूमी पूरबाधित तालुक्यातील सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्यात आहेत.

पंचगंगा नदीकाठच्या गावांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 102 बंधारे पाण्याखाली गेले असून 100 हून अधिक गावांचा अंशतः संपर्क तुटला आहे. कोल्हापूर शहरातील सखल भागात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. एनडीआरएफच्या चार तुकड्या कोल्हापूर  जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केरली गावाजवळ पुराचे पाणी आल्याने सकाळीच सोनतळी इथं स्थलांतरित होण्यासाठी निघालेल्या ग्रामस्थांना पाण्यातूनच कसरत करत मार्ग काढावा लागला.

महापुराच्या कटू आठवणी ताज्या

कोल्हापूरवासियांच्या मनात पुन्हा गेल्या वर्षीच्या पाऊस आणि महापुराच्या कटू आठवणी दाटून आल्या आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर जिल्ह्याने न भूतो न भविष्यती असा महापूर अनुभवला. महापुरात अनेकांचे बळी गेले, तर हजारो घरं उद्ध्वस्त झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. कोट्यावधी रुपयांचं नुकसान करुन गेलेल्या या महापुराच्या आठवणीनेच नदीकाठच्या गावातील लोक शहारतात.

गेल्या वर्षीचा अनुभव पाहता या वर्षी पाच महिने आधीपासूनच जिल्हा प्रशासनाने संभाव्य महापुराची तयारी केली. गेल्या वर्षीचा महापुराचा सर्वाधिक फटका करवीर तालुक्यातील आंबेवाडी आणि चिखली या गावांना बसला. त्यामुळे यावर्षी पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठताच ग्रामस्थाने स्थलांतराला सुरुवात केली.

संबंधित बातमी :

कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा महापुराचं सावट, पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली

(Kolhapur Panchganga River crosses Danger level)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें