Dattatray Bharane : कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी कार्यकर्त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल घालताच त्याला अश्रू अनावर, कारण..
"दुष्काळ आहे पाण्याचं काटकसरीने नियोजन केलं पाहिजे. लग्न समारंभ मोठ्या प्रमाणावर करण्यापेक्षा छोटे करून खर्चाला त्यांनी फाटा द्यावा" असं आवाहन दत्तात्रय भरणे यांनी केलं.

चित्रपटसृष्टीत अभिनेते, अभिनेत्रींचे तसचं स्पोर्ट्समध्ये खेळाडूंचे जसे चाहते असतात, तसचं राजकारणातही नेतेमंडळीचे चाहते असतात. आपल्या आवडत्या अभिनेत्याने-अभिनेत्रीचा चित्रपट हिट व्हावा म्हणून काही चाहते नवस बोलतात किंवा एखादी इच्छापूर्ण होईपर्यंत संकल्प सोडतात. महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा सुद्धा असाच एक कार्यकर्ता आहे, ज्याने भरणे आमदार, मंत्री व्हावेत म्हणून तीन वर्ष चप्पल सोडली होती. आता मंत्री बनल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी त्या कार्यकर्त्याचा जाहीर सत्कार करत त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल घातली. त्यावेळी कृषी मंत्र्यांसमोर त्या कार्यकर्त्याला अश्रू अनावर झालेत.
पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील पडस्थळ येथील विश्वजीत मारकड या तरुणाने गेल्या तीन वर्षापासून पायात चप्पल घातली नव्हती. इंदापूरचे लोकप्रतिनिधी म्हणून दत्तात्रय भरणे तिसऱ्यांदा आमदार व्हावेत आणि शेतकरी पुत्र म्हणून त्यांची कृषिमंत्री म्हणून मंत्रिमंडळात वर्णी लागावी असा त्याचा नवस होता. अखेर त्याचा नवस पूर्ण झाल्यानंतर आज इंदापूरच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विश्वजीत मारकड याचा सत्कार करून त्याला कोल्हापुरी चप्पल भेट दिली. यावेळी विश्वजीत मारकड याला अश्रू अनावर झाले.
मदत केलेली आहे आणि मदतही करू
लाडकी बहिण योजनेबद्दल दत्तात्रय भरणे म्हणाले की, लाडकी बहिण योजनेतील पैसे निश्चितच लाडक्या बहिणींना मिळून जातील. नांदेड जिल्हा, तालुक्यातील दोन गावं वगळली त्यावर ते म्हणाले की, शासनाचे नियम आणि निकष जे आहेत, त्या दृष्टीने आम्ही तालुक्यांना घेतलेले आहे. नियमात बसले तर ते सुद्धा तालुके त्यामध्ये बसतील. आदित्य ठाकरे यांच्या दुष्काळ दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली. “त्यांचे स्वागत आहे. त्यांनाही शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यावर त्यांचं दुःख समजेल. आम्ही अगोदरच शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो आहोत. त्यांचं दुःख ऐकलेले आहे. अडीअडचणी ऐकल्या आहेत. त्याप्रमाणे आम्ही त्यांना मदत केलेली आहे आणि मदतही करू” असं दत्तात्रय भरणे म्हणाले.
तुकाराम मुंडेंबद्दल काय म्हणाले?
“मुंडे साहेबांचे एक अधिकारी म्हणून कामकाज खूप चांगलं आहे. निश्चितच जनतेमध्ये त्यांच्याबद्दल एक वेगळी इमेज तयार झालेली आहे” असं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं.
