महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला, कोल्हापूर-कर्नाटक बस सेवा बंद

| Updated on: Dec 29, 2019 | 3:53 PM

कोल्हापूर-कर्नाटक सीमावादाचा फटका बस सेवेला बसू नये, त्याचबरोबर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून ही काळजी घेण्यात आली आहे

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला, कोल्हापूर-कर्नाटक बस सेवा बंद
Follow us on

कोल्हापूर : ‘कर्नाटक नवनिर्माण सेने’चे स्वयंघोषित नेते भीमाशंकर पाटील यांनी ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या नेत्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे (Maharashtra-Karnataka Border Dispute). या वादावरून दोन दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलनाचं सत्र पाहता पोलिसांनी कोल्हापुरातून कर्नाटकाकडे जाणाऱ्या आणि कर्नाटकातून कोल्हापुरकडे येणाऱ्या बस गाड्या रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूर-कर्नाटक सीमावादाचा फटका बस सेवेला बसू नये, त्याचबरोबर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून ही काळजी घेण्यात आली आहे (Maharashtra-Karnataka Border Dispute).

 

 

कोल्हापूर-कर्नाटकादरम्यान शनिवारी मध्यरात्रीपासून बससेवा बंद करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत बस सेवा बंद राहणार आहे. अचानक बस सेवा रद्द केल्याने कोल्हापुरातून निपाणी, बेळगावसह चंदगड भागात जाणार्‍या प्रवाशांची मात्र गैरसोय झाली आहे. अनेक प्रवासी बस स्थानकावर अडकून पडले आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, बेळगावमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे कोल्हापूर-कार्नाटक सीमावाद चिघळण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?

“महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवर उभे करुन गोळ्या घाला”, असं वादग्रस्त वक्तव्य ‘कर्नाटक नवनिर्माण सेने’चे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केलं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळला. या वक्तव्यानंतर कर्नाटकात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले. यावर प्रतिउत्तर म्हणून युवासेनेचे जिल्हा अधिकारी हर्षल सुर्वे आणि सहकाऱ्यांनी शनिवारी रात्री कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर काळी शाई फेकत जोडे मारो आंदोलन केलं. इतकंच नाही तर, रविवारी दुपारी बारा वाजता शिवसेनेकडून बस स्थानकापासून निषेध रॅली काढण्यात येणार आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटल्याने कर्नाटक राज्यात जाणाऱ्या आणि कर्नाटकातून-कोल्हापुरात येणाऱ्या सर्व बस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी मध्यरात्रीपासून सर्व बस रद्द करण्यात आल्या आहेत. तणाव आणि नुकसान टाळण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेशापर्यंत बससेवा बंद ठेवण्याचे निर्देश पोलिसांनी परिवहन महामंडळाला दिले आहेत.

सांगलीतही महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बेळगावात प्रतिकात्मक पुतळा जाळल्याच्या विरोधात महाराष्ट्र-कर्नाटक बॉर्डर वर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. म्हैशाळ-कागवाड रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आले. शिवसेनेने कर्नाटक सीमेवर आंदोलन करत भीमाशंकर पाटील आणि कर्नाटक सरकारचा पुतळा जाळला. तसेच, तिरडी मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजीही केली.

या आंदोलना दरम्यान कर्नाटक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले
यावेळी दोन्ही बाजूने कार्यकर्ते सामोरा समोर आले. त्यामुळे वातावरणात ताणाव निर्माण झाला. कर्नाटक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक हद्दीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळत असताना महाराष्ट्राच्या हद्दीत असलेल्या शिवसेना कार्यकर्ते कर्नाटकमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस आणि शिवसैनिक यांच्यात झटापट झाली.

कराड शहरात शिवसैनिकांचं आंदोलन

कोल्हापुर, सांगलीसोबतच आता कराड शहरातील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शिवसैनिकांनी कर्नाटक सरकार विरोधात आंदोलन केले आहे. यावेळी कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.