राज्यात पुढील पाच दिवस पावसाचं सावट

| Updated on: Oct 22, 2019 | 7:59 PM

राज्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी दोन दिवस, तर काही ठिकाणी पाच दिवस पावसाचा अंदाज आहे.

राज्यात पुढील पाच दिवस पावसाचं सावट
Follow us on

पुणे : राज्यातील पाऊस थांबण्याची चिन्ह अजून काही दिसत नाहीत. विधानसभेच्या मतदानावर पावसाचं सावट (Rain latest updates) तर होतंच, मात्र आता मतमोजणी आणि विजयी उमेदवारांच्या जल्लोषवरही पावसाचं सावट (Rain latest updates) आहे. त्याचबरोबर दिवाळीतही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी दोन दिवस, तर काही ठिकाणी पाच दिवस पावसाचा अंदाज आहे.

बंगालची खाडी आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

राज्यात कोकण गोवा, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज (मंगळवार) आणि बुधवारी दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. तर कोकण, गोव्यात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्रात अहमदनगर आणि पुण्यामध्ये मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस पाऊस पडेल, असं हवामान विभागाने म्हटलंय. त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा आणि सोलापुरात दोन दिवस जोरदार पाऊस पडेल. मराठवाड्यात बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल. विदर्भात मंगळवारी आणि बुधवारी कमी पाऊस आहे. मात्र गुरुवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

पुण्यात मंगळवारी आणि बुधवारी रात्री हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. रात्री विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल. तर 24 तारखेला हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर शुक्रवारी ते रविवारी दिवाळीच्या दिवशी वाऱ्याची शक्यता असून पाऊस कमी किंवा न होण्याची शक्यता आहे.