पदवीधर निवडणूक प्रचारासाठी महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी, पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये आज बैठक

| Updated on: Nov 20, 2020 | 10:17 AM

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनमध्ये ही बैठक होणार आहे.

पदवीधर निवडणूक प्रचारासाठी महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी, पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये आज बैठक
Follow us on

पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदानासाठी अवघा 10 दिवसांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची काँग्रेस भवन इथं बैठक होणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनमध्ये ही बैठक होणार आहे. शिवसेनेचे प्रमुख नेतेमंडळी आणि पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित असणार आहे. (Mahavikas Aghadi leaders meet in Pune today on the backdrop of graduate constituency elections)

दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला, मनसेमुळे तिरंगी लढत

पुणे पदवीधर मतदारसंघात (Pune Graduate Constituency Election) यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात उमेदवारांपेक्षा दोन प्रदेशाध्यक्षांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बंडखोरी टाळण्यात यश आलं. पण मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरेंमुळे ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरुण लाड (Arun Lad), भाजपचे संग्रामसिंह देशमुख (Sangram singh Deshmukh) आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी मनसेने पदवीधर निवडणुकीत उडी घेतल्यानं मतविभाजनाचा फटका टाळण्याचे आव्हान आहे.

पदवीधरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला बंडखोरी टाळण्यात यश

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अरुण लाड यांची उमेदवारी जाहीर करताच राष्ट्रवादीचे कोल्हापूरमधील नेते प्रताप माने यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रताप माने यांची समजूत काढण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे. प्रताप माने यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आग्रहामुळे उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले.

भाजपनं संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी दिल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटना पुणे पदवीधर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. रयत क्रांती संघटनेतर्फे प्रा. एन.डी. चौगुले यांनी अर्ज दाखल केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. अखेर सदाभाऊ खोत यांनी त्यांचा उमेदवार पदवीधरची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले.

गेल्या वेळी पुणे पदवीधर निवडणूक निकाल

चंद्रकांत पाटील (भाजप) (विजयी) –  61,453
सारंग पाटील (राष्ट्रवादी)- 59,072
अरुण लाड (बंडखोर)- 37,189
शैला गोडसे – 10,594
शरद पाटील – 8,519

संबंधित बातम्या:

पुणे पदवीधरचे चित्र स्पष्ट, राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यात मुख्य लढत, 62 उमेदवार रिंगणात

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी चंद्रकांतदादा मैदानात, सांगलीत चक्क शिवसेना जिल्हाप्रमुखाशी गुप्त चर्चा

पुणे पदवीधर निवडणुकीतून ‘रयत’ची माघार, तर खोतांचा सन्मान राखण्याची चंद्रकांत पाटलांची ग्वाही

Mahavikas Aghadi leaders meet in Pune today on the backdrop of graduate constituency elections