पुणे पदवीधर मतदारसंघासाठी चंद्रकांतदादा मैदानात, सांगलीत चक्क शिवसेना जिल्हाप्रमुखाशी गुप्त चर्चा

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून संग्राम देशमुख उतरले आहेत

  • राजेंद्र कांबळे, टीव्ही 9 मराठी, सांगली
  • Published On - 19:26 PM, 17 Nov 2020
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी चंद्रकांतदादा मैदानात, सांगलीत चक्क शिवसेना जिल्हाप्रमुखाशी गुप्त चर्चा

सांगली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी चक्क सांगलीतील शिवसेना जिल्हाध्यक्षांची भेट घेतली. आनंदराव पवार यांच्या कार्यालयाला भेट देत चंद्रकांतदादांनी गुप्त चर्चा केल्याची माहिती आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Pune Graduate Constituency Election 2020) चंद्रकांत पाटलांनी जुळवाजुळव केल्याचं चित्र आहे. (Chandrakant Patil meets Sangli Shivsena District Chief Anand pawar )

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्राम देशमुख (Sangram Deshmukh) उतरले आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या विरोधात चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. चंद्रकांतदादा यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्याशी सोमवारी शिवसेना कार्यालयात गुप्तपणे चर्चा केली.

सांगली जिल्ह्यामध्ये पदवीधरचे 84 हजार 191 मतदार आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादांनी सांगली जिल्ह्यातून राष्ट्रवादीच्या विरोधकांची मोट बांधण्याचे ठरवले आहे. चंद्रकांत पाटील यांनी आधी सदाभाऊ खोत यांची तलवार म्यान केली, आता शिवसेनेचे मतदार वळवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो.

इस्लामपूर नगरपालिकेतील भाजपचे पक्ष प्रतोद विक्रम पाटील यांनी या भेटीबद्दल दुजोरा दिला. इस्लामपूर नगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेची युती असून, चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नामुळेच इस्लामपूर नगरपालिकेत आम्ही सत्तेत आहोत, असं विक्रम पाटील यांनी सांगितलं.

पुण्यात मुख्य लढत कोणामध्ये?

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पुणे पदवीधरसाठी 62 तर शिक्षकसाठी 35 उमेदवार रिंगणात आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून 62 उमेदवार रिंगणात असले तरी प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यामध्ये होणार आहे. विशेष बाब म्हणजे दोघेही सांगली जिल्ह्यातील आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अरुण लाड यांची उमेदवारी जाहीर करताच राष्ट्रवादीचे कोल्हापूरमधील नेते प्रताप माने यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रताप माने यांची समजूत काढण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे. प्रताप माने यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आग्रहामुळे उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले.

भाजपनं संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी दिल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटना पुणे पदवीधर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. रयत क्रांती संघटनेतर्फे प्रा. एन.डी. चौगुले यांनी अर्ज दाखल केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. अखेर सदाभाऊ खोत यांनी त्यांचा उमेदवार पदवीधरची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले.

(Chandrakant Patil meets Sangli Shivsena District Chief Anand pawar)

पुणे पदवीधर प्रमुख उमेदवार

अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस)
संग्राम देशमुख (भाजप)
रुपाली पाटील (मनसे)
शरद पाटील (जनता दल)
सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी)
श्रीमंत कोकाटे (इतिहास संशोधक)
डॉ. अमोल पवार (आम आदमी पक्ष)
अभिजित बिचुकले (अपक्ष)

संबंधित बातम्या :

पुणे पदवीधरचे चित्र स्पष्ट, राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यात मुख्य लढत

पुणे पदवीधर निवडणुकीतून ‘रयत’ची माघार, तर खोतांचा सन्मान राखण्याची चंद्रकांत पाटलांची ग्वाही

(Chandrakant Patil meets Sangli Shivsena District Chief Anand pawar)