मल्लिकार्जुन खर्गे यांचाही कपिल सिब्बल यांच्यावर निशाणा, काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप

| Updated on: Nov 20, 2020 | 9:01 AM

पक्ष नेतृत्वाला सहकार्य करण्याची गरज आहे. आपल्याला एकत्र येऊन लढावं लागेल. पक्षातील काही नेत्यांनी पक्ष आणि पक्ष नेतृत्वाविरोधात भाष्य केलं, याचं आपल्याला दु:ख होत असल्याची भावना मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केली आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांचाही कपिल सिब्बल यांच्यावर निशाणा, काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप
Follow us on

नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षनेतृत्व आणि काँग्रेसच्या भूमिकेबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नावरुन काँग्रेसमध्ये जोरदार घमासान सुरु आहे. काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांच्यानंतर आता मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सिब्बल यांना नाव न घेता खडे बोल सुनावले आहेत. असे काही लोक पक्षाला आतून कमकुवत करण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोप खर्गे यांनी केला आहे. (Mallikarjun Kharge’s criticism of Kapil Sibal)

पक्ष नेतृत्वाला सहकार्य करण्याची गरज आहे. आपल्याला एकत्र येऊन लढावं लागेल. पक्षातील काही नेत्यांनी पक्ष आणि पक्ष नेतृत्वाविरोधात भाष्य केलं, याचं आपल्याला दु:ख होत असल्याची भावना मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केली आहे. एका बाजूला भाजप आणि RSS आहे. तर दुसरीकडे काँग्रेसलाच आतून कमकुवत करणारे काही लोक आहेत, अशी टीकाही खर्गे यांनी पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर केलीय. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात खर्गे बोलत होते.

अधीर रंजन चौधरींचं कपिल सिब्बल यांना प्रत्युत्तर

अधीर रंजन चौधरी यांनी कपिल सिब्बल यांना टोला लगावताना काही न करताच बोलणं याला आत्मपरिक्षण म्हणायचं का? असा प्रश्न विचारला आहे. ‘कपिल सिब्बल यांनी यापूर्वीही असंच मत व्यक्त केलं होतं. ते काँग्रेस पक्ष आणि आत्मपरिक्षणाच्या मुद्द्यावर खूप चिंतित आहेत. पण आम्ही त्यांना बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात निवडणुकीत कुठेच पाहिलं नाही’, असा टोला चौधरी यांनी सिब्बल यांना लगावला आहे. एका माजी केंद्रीय मंत्र्यानं पक्षातील अंतर्गत मुद्दे माध्यमांमध्ये बोलणं चुकीचं असल्याचा सल्ला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कपिल सिब्बल यांना दिला आहे.

लोकांना आमच्याकडून आशा उरल्या नाहीत- सिब्बल

अलीकडच्या काळातील निवडणुकांचे निकाल पाहता देशातील जनता काँग्रेसकडे एक सक्षम पर्याय म्हणून पाहत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाने अजूनही बिहारमधील पराभवाची दखल घेतलेली दिसत नाही, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले. बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाला फारसे गांभीर्य नसल्याची खंतही कपिल सिब्बल यांनी बोलून दाखविली. या पराभवानंतर पक्षनेतृत्त्वाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आल्याचे माझ्या कानावर अद्याप आलेले नाही. कदाचित सर्वकाही सुरळीत आहे आणि बिहारचा पराभव ही सामान्य बाब आहे, असे पक्षनेतृत्त्वाला वाटत असावे, अशी टिप्पणी सिब्बल यांनी केली.

संबंधित बातम्या:

बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये घमासान, अधीर रंजन चौधरींचं कपिल सिब्बल यांना जोरदार प्रत्युत्तर

कपिल सिब्बल यांच्यामुळे देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या, अशोक गेहलोतांची ट्विटची सरबत्ती

लोकांना आमच्याकडून आशा उरलेल्या नाहीत; काँग्रेस नेतृत्त्वाला बिहारमधील पराभव सामान्य बाब वाटत असावी: कपिल सिब्बल

Mallikarjun Kharge’s criticism of Kapil Sibal