दानवे, गोरंट्याल यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांचा थाळीनाद; दानवेंचे बंधूही आंदोलनात सहभागी

मराठा आंदोलकांनी भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री, जयंत पाटील, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या घरासमोरही थाळीनाद करून आरक्षणाची मागणी केली.

दानवे, गोरंट्याल यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांचा थाळीनाद; दानवेंचे बंधूही आंदोलनात सहभागी
| Updated on: Oct 02, 2020 | 2:31 PM

जालना: मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाने सुरू केलेलं आंदोलन अजूनही सुरूच आहे. या आंदोलकांनी केंद्रीय आणि राज्यातील मंत्री, खासदार आणि आमदारांच्या घरासमोर ढोलताशा वाजवत थाळीनाद आंदोलन केलं. आंदोलकांनी भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री, जयंत पाटील, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या घरासमोरही थाळीनाद करून आरक्षणाची मागणी केली. दानवे यांचे चुलत बंधू आणि भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनीही आंदोलनात भाग घेत मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. (maratha youth protest for Maratha Reservation)

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यापार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने आज जालन्यात आमदार कैलास गोरंट्याल यांच्या घरासमोर ढोलताशे वाजवून थाळीनादही केला. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं आणि एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चुलत बंधू आणि भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे हे सुद्धा आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांना मागण्यांचे निवेदन दिलं.

हलगी वाजवून ठिय्या आंदोलन

या आंदोलकांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन नाक्याजवळील घरासमोरही जोरदार आंदोलन केलं. आंदोलकांनी ढोलताशे वाजवून घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. सांगलीतही आंदोलकांनी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्य घरासमोर आंदोलन करत कदम यांना मागण्यांचे निवेदन सादर केल. सकल मराठा समाजाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील घरासमोर जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी हलगी वाजवून आपला रोष व्यक्त केला. तर, नगरमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला. (maratha youth protest for Maratha Reservation)

संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

मराठा आरक्षणाची ओवाळणी द्या, बाळासाहेब थोरातांच्या घराबाहेर बहिणीचा ठिय्या

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासनाचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याबाबत चर्चा, अशोक चव्हाणांची शरद पवारांसोबत बैठक

(maratha youth protest for Maratha Reservation)