पाकिस्तानात महागाईचा आगडोंब, दूध दर 180 रुपये लिटर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानात महागाईचा आगडोंब उसळला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. टोमॅटो, भाज्यांनंतर आता दूध दरानेही महागाईचं टोक गाठलं आहे. पाकिस्तानच्या कराची फार्मर्स असोसिएशनने अचानकपणे दूध दरात 23 रुपयांची वाढ केली. त्यामुळे पाकिस्तानमध्ये दूध दर तब्बल 120 ते 180 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. अनेक ठिकाणी दूध 100 रुपयांपासून 180 रुपये प्रति लिटरने विकलं […]

पाकिस्तानात महागाईचा आगडोंब, दूध दर 180 रुपये लिटर
Follow us on

इस्लामाबाद : पाकिस्तानात महागाईचा आगडोंब उसळला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. टोमॅटो, भाज्यांनंतर आता दूध दरानेही महागाईचं टोक गाठलं आहे. पाकिस्तानच्या कराची फार्मर्स असोसिएशनने अचानकपणे दूध दरात 23 रुपयांची वाढ केली. त्यामुळे पाकिस्तानमध्ये दूध दर तब्बल 120 ते 180 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. अनेक ठिकाणी दूध 100 रुपयांपासून 180 रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. पाकिस्तान सरकारने दुधाचे दर 94 रुपये प्रति लिटर ठरवले आहेत. तरीही बाजारात 100 ते 180 रुपये प्रति लिटर दराने दूध विक्री होत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या जनतेला भाज्या आणि पेट्रोल-डिझेलनंतर  दुधासाठीही अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांचं महागाईने कंबरडे मोडलं आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार, कराची फार्मर्स असोसिएशनने अनेकदा सरकारला दुधाचे भाव वाढवण्याची विनंती केली. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने असोसिएशन स्वत:च हा निर्णय घेतला. दुसरीकडे, पाकिस्तान सरकारने असोसिएशनचा हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. तसेच, निश्चित भावापेक्षा जास्त किंमतीत दूध विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याचंही सरकारने स्पष्ट केलं. याप्रकरणी एका दूध विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. तर दुसरीकडे, पाकच्या अंतर्गत समस्याही वाढत आहेत. पाकिस्तानचे नागरिक भाज्या, पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे आधीच हैराण झालेले आहेत. त्यातच आता दूधाचे दरही मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत.

पाकिस्तानमध्ये महागाईने गेल्या पाच वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानमध्ये महागाईचा दर 9.4 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. महागाईत वाढ, रुपयाची घसरण आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात 10.75 टक्क्यांची वाढ केली. पाकिस्तानात महागाई वाढण्यामागे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती हे मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये पाकिस्तानात भाज्या, फळं आणि मांस यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे जुलै ते मार्चदरम्यान पाकिस्तानात महागाई दर सरासरी 6.97 टक्क्यांनी वाढला आहे.

या सर्व प्रकारामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली असून एक प्रकारचे अराजक माजलं आहे.