वेळप्रसंगी कर्ज काढू, पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करु : अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी आज (19 ऑक्टोबर) पावसामुळे नुकसान झालेल्या जालना तालुक्यातील कुंभेफळ, अंतरवाला भागात जाऊन कपाशी आणि सोयाबीनच्या पिकांची पाहणी केली.

वेळप्रसंगी कर्ज काढू, पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करु : अब्दुल सत्तार

जालना : “अतिवृष्टीमुळे राज्यातील ज्या भागात जास्त नुकसान झालंय त्या भागातील महसूल वसूली थांबवण्याचे आदेश देऊ. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई कोणत्याही परिस्थितीत मिळणार. यासाठी वेळप्रसंगी कर्ज काढू, पण शेतकऱ्यांना मदत करु”, असं आश्वासन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी दिलं.

सत्तार यांनी आज (19 ऑक्टोबर) जालना तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या कुंभेफळ, अंतरवाला भागात जाऊन कपाशी आणि सोयाबीनच्या पिकांची पाहणी केली. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका केली.

“विरोधक ज्या ताकदीने राज्य सरकारवर टीका करत आहेत तेवढीच ताकद त्यांनी केंद्राकडून राज्याला आर्थिक मदत मिळण्यासाठी वापरावी”, असं अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) म्हणाले.

“विरोधकांनी राज्याची आर्थिक परिस्थिती खराब करुन ठेवल्यानेच ही परिस्थिती सुधारण्यासाठी मंत्री दौरे करत आहेत. विरोधकांनी आपली ताकद वापरुन महाराष्ट्राला मदत करायला हवी. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी विरोधकांचाही सिंहाचा वाटा हवा”, असं आवाहन सत्तार यांनी केलं.

दरम्यान, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारस असल्याचे सिद्ध करा अन्यथा खुर्ची सोडा, अशी टीका त्यांनी केली होती. या टीकेलादेखील सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलं.

“उद्धव ठाकरे यांनी केंद्राचं कोणतंही सहकार्य नसताना राज्यात सक्षमपणे सरकार चालवलं. तेच बाळासाहेबांचे वारसदार आहेत हे मेटे यांना कळत नाही का?”, असा सवाल अब्दुल सत्तार यांनी केला.

संबंधित बातम्या: 

ओला दुष्काळ जाहीर करा, औरंगाबादेत शेतकरी आक्रमक! जिल्हाधिकारी कार्यालयावर फेकल्या कुजलेल्या भाज्या

सरकारच्या नाकर्तेपणामुळे पवार साहेबांना मुख्यमंत्र्यांचा बचाव करावा लागतोय- देवेंद्र फडणवीस

Published On - 1:28 pm, Mon, 19 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI