Corona | एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची आरोग्य मंत्र्यांची सूचना

| Updated on: Mar 15, 2020 | 5:50 PM

मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात 9 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कस्तुरबा गांधी रुग्णालयाची भेट घेतली (Health Minister Rajesh Tope).

Corona | एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची आरोग्य मंत्र्यांची सूचना
Follow us on

मुंबई : “एमपीएससी परीक्षा विभाग हे स्वायत्त आहे. त्यामुळे एमपीएससीचे चेअरमन यांना परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षा पुढे ढकलण्यात येईल”, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) म्हणाले आहेत. मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात 9 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कस्तुरबा गांधी रुग्णालयाची भेट घेतली आणि सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. या आढावानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली (Health Minister Rajesh Tope).

‘अडचणी जाणून घेण्यासाठी आलो’

“राज्यात 32 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या 32 पैकी 9 रुग्णांना कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ते विलगीकरण कक्ष आहेत. मी या हॉस्पिटलमध्ये दोन गोष्टींसाठी आलो होतो. एक म्हणजे रुग्णांना दुरुन पाहून त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करायची आणि त्यांच्या काही अडचणी आहेत का, ते जाणून घ्यायचं होतं. त्याचबरोबर रुग्णालयात 80 संशयित रुग्ण दाखल आहेत. त्यांनाही काही अडचण आहे का? हे जाणून घ्यायचं होतं. इथे ओपीडी चालू आहे. दररोज 300 ते 350 रुग्ण रुग्णालयात येत आहेत. ओपीडी जिथे चालते तिथेही काही अडचण येत आहेत का? त्याचबरोबर रुग्णालयातील लॅबोरेटरीला काही अडचणी आहेत का? ते जाणून घेण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात आलो होतो”, असं राजेश टोपे म्हणाले.

‘कस्तुरबा रुग्णालयातील लॅबची क्षमता दुप्पट करणार’

“कस्तुरबा रुग्णालयाची क्षमता ही 80 बेडची आहे. ती आपण 100 केली आहे. रुग्णांना टीव्ही, वायफाय, पेपर, जेवण, फळं देण्यापर्यंतच्या सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत. कस्तुरबा रुग्णालयातील लॅबची क्षमता ही प्रतिदिन 100 टेस्ट अशी आहे. ही क्षमता आपल्याला दुप्पट करायची आहे. त्यासाठी मशिन उपलब्ध केलं जाईल आणि बुधवारपर्यंत प्रतिदिन 350 टेस्ट अशी क्षमता केली जाणार आहे. एकाच लॅबवर विसंबून चालणार नाही. केईएम हॉस्पिटलमध्येही अशाच स्वरुपाचं नवीन मशिन बसवलं जाणार आहे. तिथे दिवसाला 250 टेस्ट होतील”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

‘मिरज, सोलापूर, धुळे आणि औरंगाबाद येथे लॅब सुरु करणार’

“याव्यतिरिक्त साधारणपणे 15 ते 20 दिवसांच्या आत जे.जे., हाफकिन मुंबई, बीजे पुणे याठिकाणी देखील नवीन लॅब सुरु करणार आहोत. त्यासंदर्भातील सर्व आदेश दिले जाणार आहेत. जिथे मेडीकल कॉलेजची हॉस्पिटल आहेत तिथे लॅब उभारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मिरज, सोलापूर, धुळे आणि औरंगाबाद या चारही ठिकाणी लॅब उभारण्याचे निर्णय झाले आहेत. महिन्याभराच्या आत हे सर्व लॅब सुरु होतील”, असंदेखील राजेश टोपे यांनी सांगितलं.