झालं… राष्ट्रवादीची समजूत काढली तर आता शिवसेना नाराज; नागपूर पदवीधर मतदारसंघात मानापमान नाट्य

| Updated on: Nov 13, 2020 | 8:44 AM

अभिजित वंजारी यांचा अर्ज भरतेवेळी निमंत्रण दिले नाही म्हणून शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आता रुसून बसले आहेत. | Nagpur graduate constituency election 2020

झालं... राष्ट्रवादीची समजूत काढली तर आता शिवसेना नाराज; नागपूर पदवीधर मतदारसंघात मानापमान नाट्य
Follow us on

नागपूर: नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nagpur graduate constituency election 2020) महाविकासआघआडीत निर्माण झालेले नाराजीनाट्य काही केल्या थांबायचे नाव घेताना दिसत नाही. सुरुवातीला या मतदारसंघात काँग्रेसला उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांच्याकडून निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु होती. अखेर काँग्रेस नेत्यांनी मध्यस्थी करून हा तिढा सोडवला. मात्र, आता त्यानंतर शिवसेनेचे स्थानिक नेते नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघात आघाडीतील बिघाडी अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. (Nagpur graduate constituency election 2020)

नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकासआघाडीकडून काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, हा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज होते. पदवीधर मतदारसंघाचा अर्ज भरण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस होता. तरीदेखील काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही, यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे तळ्यात-मळ्यात सुरु होते. अखेर काल काँग्रेसच्या नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने नरमाईची भूमिका घेतली आहे.

मात्र, काल अभिजित वंजारी यांचा अर्ज भरतेवेळी निमंत्रण दिले नाही म्हणून शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आता रुसून बसले आहेत. शिवसेनेच्या या नेत्यांनी निवडणुकीत सहकार्य न केल्यास काँग्रेसपुढे अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे काँग्रेस उमेदवारापुढे घटक पक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान असल्याची चर्चा नागपूरच्या राजकीय वर्तुळात आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघात एकूण 31 उमेदवारी रिंगणात आहेत. भाजप आणि काँग्रेस उमेदवाराच्या नावात साम्य असलेले आणखी दोन उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. आज उमेदवारी अर्जाची छननी होणार आहे. त्यानंतर 15 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावात साधर्म्य असलेले उमेदवार आपला अर्ज मागे घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्या दोन्ही उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. तर मात्र भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपच्या संदीप जोशी आणि काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांच्यात मुख्य लढत रंगू शकते. तर विदर्भवादी नितीन रोंधे आणि वंचित आघाडीचे राहुल वानखेडे यांनीही आव्हान उभे केल्याने नागपूरच्या पदवीधर मतदरासंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या:

विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक : कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण?

पदवीधर मतदारसंघात मतदानाचा हक्क कुणाला?; कसा येतो आमदार निवडून?

नागपूर पदवीधरसाठी एकूण ३१ उमेदवार, निवडणूक मैदानात 2 संदीप जोशी आणि 2 अभिजीत वंजारी!

(Nagpur graduate constituency election 2020)