नॉन एसी ट्रेनसाठी ऑनलाइन बुकिंगची वेळ जाहीर, ‘या’ शंभर ट्रेन एक जूनपासून धावणार

| Updated on: May 21, 2020 | 9:01 AM

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कोणार्क एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस, हुसेन सागर एक्स्प्रेस 1 जूनपासून सुटणार आहेत (Non AC Trains Timetable Announced by Railway Minister Piyush Goyal)

नॉन एसी ट्रेनसाठी ऑनलाइन बुकिंगची वेळ जाहीर, या शंभर ट्रेन एक जूनपासून धावणार
Follow us on

नवी दिल्ली : येत्या 1 जूनपासून देशभरात 200 नॉन एसी रेल्वेगाड्या नियोजित वेळेनुसार धावणार आहेत. त्यासाठी आज सकाळी (21 मे) 10 वाजल्यापासून तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग सुरु करण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटवरवरुन यासंदर्भात घोषणा करुन शंभर ट्रेनचे वेळापत्रक जाहीर केले. स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक विशेष ट्रेन सुरु केल्यानंतर भारतीय रेल्वे हळूहळू रुळावर येताना दिसत आहे. (Non AC Trains Timetable Announced by Railway Minister Piyush Goyal)

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कोणार्क एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस, हुसेन सागर एक्स्प्रेस 1 जूनपासून सुटणार आहेत. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून दरभंगा एक्स्प्रेस, कामयानी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, तर वांद्रे टर्मिनसहून सूर्यनगरी एक्स्प्रेस, अवध एक्स्प्रेस या ट्रेन सुटणार आहेत. यासाठी ऑनलाइन बुकिंग सुरु होत आहे.

पीआयबीच्या वेबसाईटवर 100 ट्रेनची यादी जाहीर करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सर्व मेल/एक्स्प्रेस, प्रवासी आणि उपनगरी सेवांसह इतर नियमित प्रवासी ट्रेन मात्र पुढील आदेशापर्यंत रद्द राहतील.

केवळ आयआरसीटीसी वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे ई-तिकीट दिले जाईल. कोणत्याही रेल्वे स्थानकावरील आरक्षण काऊंटरवर तिकिटे आरक्षित केली जाणार नाहीत. ट्रेनमध्ये कोणताही अनारक्षित कोच राहणार नाही. त्यामुळे तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे, असं रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

ट्रेन तिकिटाचे दर नेहमीप्रमाणे असतील. जनरल कोचही राखीव असल्याने सेकंड सीटिंग (2 एस) भाडे आकारले जाईल आणि सर्व प्रवाशांना सीट दिली जाईल. आगाऊ आरक्षण कालावधी हा जास्तीत जास्त 30 दिवस असेल. या विशेष गाड्यांमध्ये दिव्यांग आणि 11 प्रकारच्या रुग्णांना सवलती मिळतील.

केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल. ट्रेनमध्ये जाण्यापूर्वी स्क्रिनिंग करणे आवश्यक आहे. आणि ट्रेनमध्ये केवळ लक्षणं नसलेल्या प्रवाशांनाच प्रवेश करण्याची परवानगी आहे. ट्रेनमध्ये ब्लँकेट, चादरी आणि पडदे दिले जाणार नाहीत.