शिक्षिकेला डोळा मारुन अश्लिल वर्तन, पंढरपुरात पहिलीच्या मुलाची शाळेतून हकालपट्टी

अवघ्या सहा वर्षाचा हा मुलगा विद्यार्थिनी आणि शिक्षिकांना डोळा मारतो, अश्लिल वर्तन करतो असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत.

शिक्षिकेला डोळा मारुन अश्लिल वर्तन, पंढरपुरात पहिलीच्या मुलाची शाळेतून हकालपट्टी

पंढरपूर : पंढरपुरातील एका शाळेने पहिलीच्या वर्गात शिकत असलेल्या अवघ्या सहा वर्षांच्या एका विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला आहे. शाळेने दिलेलं कारण अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे. कारण अवघ्या सहा वर्षाचा हा मुलगा विद्यार्थिनी आणि शिक्षिकांना डोळा मारतो, अश्लिल वर्तन करतो असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. तसं लेखी पत्र शाळेने संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाला दिलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे संबंधित विद्यार्थ्याला राईट टू एज्युकेशन कायद्यांतर्गत या शाळेत प्रवेश मिळाला होता. मोफत शिक्षण मिळणार असल्याने पालकानाही आनंद झाला. मात्र शाळेने फी मागायला सुरुवात केली. तडजोड करुन ही फी भरल्याचा दावा पालकांचा आहे. मात्र शाळेने केलेले हे आरोप अत्यंत निराधार, लाजिरवाणे आणि बिनबुडाचे असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.

दोन दिवसापूर्वी शाळेतील शिक्षीकेने मुलाच्या पालकांना शाळेत बोलावून घेतले. मुलाबद्दल काही किरकोळ तक्रार असेल असं त्यांना वाटले. पण शिक्षीकेने जे सांगितले त्याने पालक हादरुन गेले. सहा वर्षांचा पहिलीच्या वर्गातील मुलगा शाळेतील विद्यार्थिनी आणि शिक्षिकांशी अश्लील वर्तन करत असल्याचे  त्यांना सांगण्यात आलं. यामुळे मुलाचा शाळेतील प्रवेश रद्द केला आहे. तसे पत्र पालकांना दिले.

याबाबत संबधित शाळेशी संपर्क केला असता तेथील समन्वयकांनी हा सर्व प्रकार खरा असून  या मुलाच्या अशा कृत्यामुळे इतर विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ शकतो, शाळेची गुणवत्ता खराब होऊ शकते. याचा विचार करून आपण त्याचा प्रवेश रद्द केल्याचं सांगितले.

या प्रकारामुळे मोफत शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळला असतानाही या विद्यार्थ्यास आता या शाळेत शिक्षण घेता येणार नाही. अनेकदा वेगवेगळ्या कारणांसाठी शाळेत शिक्षा मिळते, पुन्हा शाळेत शिक्षण घेता येते. पण शाळेने केलेल्या आरोपामुळे आता या विद्यार्थ्यास दुसरीकडे शिक्षण घ्यावे लागणार आहे. मात्र शाळेचे आरोप इतके गंभीर आहेत की या विद्यार्थ्यावर कायमस्वरुपी शिक्का बसण्याची भीती पालकांना आहे.

आरोप खोटे : पालक

दरम्यान, “ज्या शिक्षिकेने हे आरोप केले आहेत, त्यांनी समोर येऊन सांगावं, सिद्ध करुन दाखवावं. 6 वर्षाचा मुलगा डोळा मारतो, अश्लिल कृत्य, अश्लिल चाळे करतो हे न पटणारे आहे. मी मुलाला घेऊन पोलिस स्टेशनला गेलो, मॅडमलाही येण्यास सांगितलं, पण मॅडम आल्या नाहीत. पहिलीतील मुलगा असं करु शकेल का?” असा प्रश्न मुलाच्या पालकांनी विचारला.

Published On - 7:42 pm, Mon, 16 September 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI