पंकजा मुंडेंनी दुसऱ्या कोणाची तरी भाषा बोलू नये; ऊसतोड कामगारांची अवस्था पाहा- प्रकाश आंबेडकर

| Updated on: Oct 25, 2020 | 5:30 PM

ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदार यांना दीडशे टक्के वाढीव भाव मिळावा म्हणून अनेक दिवसांपासून ऊसतोड मजूर संघटनांनी संप पुकारला आहे. | Prakash Ambedkar

पंकजा मुंडेंनी दुसऱ्या कोणाची तरी भाषा बोलू नये; ऊसतोड कामगारांची अवस्था पाहा- प्रकाश आंबेडकर
Follow us on

अहमदनगर: पंकजा मुंडे यांनी दुसऱ्या कोणाची तरी भाषा बोलू नये. त्यांनी ऊसतोड कामगारांची अवस्था पाहावी, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले. ऊसतोड कामगारांच्या आंदोलनावरुन सुरु असलेले राजकारण पंकजा मुंडे यांनी लक्षात घ्यावे. त्यांना ऊसतोड कामगारांची परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी इतरांची भाषा बोलण्यापेक्षा ऊसतोड कामगारांची अवस्था पाहून निर्णय घ्यावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. (Prakash Ambedkar on Sugercane cutters agitation in Maharashtra)

ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदार यांना दीडशे टक्के वाढीव भाव मिळावा म्हणून अनेक दिवसांपासून ऊसतोड मजूर संघटनांनी संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी भगवानगडाच्या पायथ्याशी ऊस कामगारांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात प्रकाश आंबेडकर यांनी ऊस कामगारांच्या आंदोलनाचे समर्थन केले. ऊस कामगारांना आणखी काही दिवस आंदोलन सुरु ठेवावे. आपल्या मागण्या मान्य करून घेण्याची संधी चालून आली आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

ऊसतोड कामगारांनी आंदोलन करुन साखर कारखानदारांचे नाक दाबून ठेवले आहे. साखर कारखान्यांनी मशीन्सच्या साहाय्याने ऊस कापायचे ठरवले तरी 100 टक्के ऊसाची कापणी शक्य नाही. मशीन ही सहा इंचवरून ऊस कापते. मात्र, जास्त साखर ऊसाच्या खालच्या पेरात असते. त्यामुळे ऊसतोड कामगारांना मशीनच्या कापणीइतका दर मिळू शकतो. त्यासाठी आणखी काही काळ तग धरण्याची गरज असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

याशिवाय, प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ऊसतोड कामगारांच्या मजुरीसंदर्भात विधानसभेत कायदा मंजूर करण्याची मागणी केली. माथाडी बोर्ड स्थापन करण्याची मागणी मंजूर झाली तर सर्व प्रश्न सुटतील. याशिवाय, ऊसतोड कामगारांच्या बोर्डामुळे मजुरांना किती मजुरी द्यायची, हा प्रश्नही निकालात निघेल. त्यासाठी तीन वर्षांचा करार केला जावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

संबंधित बातम्या:

सुरेश धस ऊसतोड कामगारांना धमकी देताय काय?; पंकजा मुंडेंचा थेट इशारा

मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन, पंकजा मुंडेंचा विरोधकांना इशारा

तुम्ही खचू नका, तुमच्या जीवावर मी उभी आहे, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात दुफळी, ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर आमनेसामने

(Prakash Ambedkar on Sugercane cutters agitation in Maharashtra)