‘मी परमेश्वराला नाही मात्र मोदींना बघितलंय’, महिलेच्या प्रतिक्रियेनंतर पंतप्रधान मोदी भावूक

| Updated on: Mar 07, 2020 | 3:41 PM

"नरेंद्र मोदीजी मी परमेश्वराला बघितलेलं नाही. मात्र, तुमच्यात मला परमेश्वर दिसला", असं म्हणत असताना महिलेला अश्रू अनावर झाले (PM Narendra Modi emotional).

मी परमेश्वराला नाही मात्र मोदींना बघितलंय, महिलेच्या प्रतिक्रियेनंतर पंतप्रधान मोदी भावूक
Follow us on

नवी दिल्ली : “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मी परमेश्वराला बघितलेलं नाही. मात्र, तुमच्यात मला परमेश्वर दिसला. मी परमेश्वराला नाही, मोदींना पाहिलंय”, असं म्हणत असताना महिलेला अश्रू अनावर झाले (PM Narendra Modi emotional). या महिलेचं नाव दीपा शाह असं आहे. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होती. यावेळी तिला अश्रू अनावर झाले. तिला रडताना बघितल्यावर मोदीही भावूक झाले (PM Narendra Modi emotional).

“मोदीजी मला 2011 साली पॅरालिसिसचा झटका आला. मी बोलू शकत नव्हती. माझ्यावर उपचार सुरु होते. माझी औषधं प्रचंड महाग होती. त्यामुळे घर चालवणं कठीण झालं होतं. आपल्याद्वारे जन औषधी मिळाल्या. जे औषध 5000 रुपयांत मिळत होते, ते आता मला फक्त 1500 रुपयांत मिळतं. यामुळे मला 3500 रुपयांचा फायदा होतो. या पैशांवर माझा उरलेला खर्च होतो. या पैशांमध्ये मी फळं खाते. मोदीजी मी परमेश्वाराला बघितलं नाही. मात्र, तुमच्या रुपात मी परमेश्वाराला पाहिलं आहे. मी आपली खूप आभारी आहे”, असं म्हणत महिलेला अश्रू अनावर झाले.

“जन औषधी दिन हा फक्त एक योजना साजरा करण्याचा दिवस नाही तर त्या कोट्यवधी परिवारांना एकत्र आणण्याचा दिवस आहे ज्यांनी या योजनेचा फायदा घेतला. ही योजना म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वस्त दरात औषध पोहोचवण्याची संकल्पना आहे. आतापर्यंत 6 हजार पेक्षा जास्त जन औषधी केंद्र देशभरात सुरु झाले आहेत”, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

जनऔषध दिवस का साजरा केला जातो?

जेनरिक औषधांबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी जनऔषध दिवस साजरा केला जातो. याची सुरुवात 7 मार्च 2019 पासून झाली.

जेनरिक औषधं म्हणजे काय?

जेनरिक औषध म्हणजे जे औषधं ब्रँडेड नसतात, मात्र ब्रँडेड औषधांएवढाच त्यांचा फायदा होतो. हे औषधं ब्रँडेड औषधांच्या तुलनेत स्वस्त असतात. त्यामुळे या औषधांबाबत मोदी सरकारने जनजागृती मोहिम सुरु केली.