विहिरीत पडलेला उंदीर काढणे जीवावर, तिघा मजुरांचा विषारी वायूने गुदमरुन मृत्यू

विहिरीत असलेला विषारी वायू नाकातोंडात गेल्याने नागपुरात तिघांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची माहिती आहे.

विहिरीत पडलेला उंदीर काढणे जीवावर, तिघा मजुरांचा विषारी वायूने गुदमरुन मृत्यू
| Updated on: Aug 20, 2020 | 8:57 AM

नागपूर : विहिरीत पडलेला उंदीर काढण्याची धडपड तिघा मजुरांच्या जीवावर बेतली. विषारी वायूने गुदमरुन तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. (Poisonous Gas in well kills three Labors in Nagpur while taking rat out)

नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील वाकेश्वर या ठिकाणी ही घटना घडली. 27 वर्षीय आकाश पंचबुद्धे, 37 वर्षीय विनोद बर्वे आणि 28 वर्षीय गणेश काळबांडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

बद्रीनारायण सपाटे यांच्या शेतात धान पिकांना खत देण्यासाठी आकाश पंचबुद्धे, विनोद बर्वे आणि गणेश काळबांडे गेले होते. दुपारच्या सुमारास शेतातील विहिरीत उंदीर दिसल्यानं त्याला काढण्यासाठी एक मजूर विहिरीत उतरला.

आत गेलेला सहकारी बाहेर येत नसल्याने त्याला काढण्यासाठी दुसरा आणि नंतर तिसरा उतरला. मात्र, विहिरीत असलेल्या विषारी वायूने तिघांचा घात केला. विषारी वायू नाकातोंडात गेल्याने गुदमरुन तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

गावात ही बातमी पसरल्यावर गावकरी आणि पोलिस घटनास्थळी पोहचले. तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. ऐन पोळ्याच्या पाडव्याला तीन कुटुंबातील कर्ते पुरुष गेल्यानं कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे.

विहिरीतील विषारी वायुमुळे तिघांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.