पुणे पालिकेतील सत्ताधारी भाजपला अजित पवारांचा दणका, रस्ते रुंदीकरणाचा निर्णय स्थगित

| Updated on: Jun 17, 2020 | 7:41 AM

पुणे शहरातील 323 अरुंद रस्ते नऊ मीटर करण्याचा निर्णय स्थायी समितीतील बहुमताच्या जोरावर भाजपने घेतला होता (Pune Guardian Minister Ajit Pawar Stays Road Widening Decision by BJP led PMC)

पुणे पालिकेतील सत्ताधारी भाजपला अजित पवारांचा दणका, रस्ते रुंदीकरणाचा निर्णय स्थगित
चंद्रकांत पाटील आणि अजित पवार
Follow us on

पुणे : पुणे शहरातील 323 अरुंद रस्ते प्रत्येकी नऊ मीटर रुंद करण्याच्या सत्ताधारी भाजपच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर सहा मीटर रस्त्यावर टीडीआर वापरण्यासाठी बंधने उठवण्यात आली आहेत. (Pune Guardian Minister Ajit Pawar Stays Road Widening Decision by BJP led PMC)

रस्त्याच्या दोन्ही बाजूला दीड मीटर सोडाव्या लागणार्‍या साईट मर्जिंनमध्ये सूट देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. पुणे शहरातील 323 अरुंद रस्ते नऊ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्थायी समितीतील बहुमताच्या जोरावर भाजपने हा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप होता.

काही बांधकाम व्यावसायिकांच्या हिताचा हा प्रस्ताव असल्याचा दावा महाविकास आघाडीने केला होता. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी या प्रस्तावास विरोध केला होता. या प्रकरणी पालकमंत्री अजित पवार यांनीही बहुमताच्या जोरावर निर्णय लादू नका असे निर्देश दिले होते.

हेही वाचा : शिवसेनेला पदाचा मोह नाही हे खरंय, त्यांचा त्याग मोठा : सुधीर मुनगंटीवार

महाविकास आघाडीच्या पालिकेतील गटनेत्यांनी, राष्ट्रवादीच्या आमदारांनी स्थगितीची मागणी केली होती. यासंदर्भात अजित पवार यांनी मंगळवारी मंत्रालयात बैठक घेतली. नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांसह इतर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

महापालिकेला पाचपेक्षा अधिक रस्ते रुंद करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे स्थायी समितीत मंजूर झालेला ठराव बेकायदेशीर असल्याने स्थगिती देण्याचा निर्णय बैठकीत घेतला.

या माध्यमातून महापालिका विरुद्ध राज्य सरकार संघर्ष होण्याची शक्यता आहे. आघाडीने सत्ताधारी भाजपवर कुरघोडी केली. त्याचबरोबर अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही मात केली.