पुण्यात 17 गुंठे जमिनीसाठी 68 वर्षांच्या महिलेचं अपहरण

| Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM

सचिन चपळगांवकर, टीव्ही 9 मराठी, पिंपरी : पुण्यातल्या बाणेरमध्ये केवळ 17 गुंठे जागेसाठी एका 68 वर्षांच्या वृद्धेचं अपहरण करुन तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रसिद्ध पुराणिक बिल्डरने हे अपहरण आणि फसवणूक केली आहे. पोलिसांनी आता पुराणिक बिल्डर्स आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला असून, प्रकरण गुन्हे विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. नेमका प्रकार […]

पुण्यात 17 गुंठे जमिनीसाठी 68 वर्षांच्या महिलेचं अपहरण
Follow us on

सचिन चपळगांवकर, टीव्ही 9 मराठी, पिंपरी : पुण्यातल्या बाणेरमध्ये केवळ 17 गुंठे जागेसाठी एका 68 वर्षांच्या वृद्धेचं अपहरण करुन तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रसिद्ध पुराणिक बिल्डरने हे अपहरण आणि फसवणूक केली आहे. पोलिसांनी आता पुराणिक बिल्डर्स आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला असून, प्रकरण गुन्हे विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय आहे?

आयटी पार्क झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जमिनीचे भाव गगनाला भिडले. त्यातूनच अंडरवर्ल्ड आणि राजकारणी जमिनीच्या व्यवहारांत उतरले. गोरगरिब, एकटे वृद्ध यांना हुडकून त्यांच्या कोट्यवधींच्या जमिनी फुकटात लाटण्याचा धंदाच सुरु झाला. या धंद्यातलीच ही कहाणी आहे. पार्वती शंकर ऊर्फ बबन भाडाळे या 68 वर्षांच्या वृद्ध महिलेची.

देवाची आळंदीमध्ये पार्वती यांची 17 गुंठे जमीन आहे. या जमिनीची किंमत सध्या कोटींच्या घरात आहे. त्यामुळे जमिनीवर अर्थात भूमाफियांच्या नजर पडली. पार्वती या घरी असताना त्यांचा मामेभाऊ सुनील बांदल हा घरी आला. गणेश कुऱ्हे (पार्वती यांचा नातू) हा मुंबईला गेला असून, त्याने मला तुला शिवाजीनगर येथील न्यायालयात न्यायला सांगितल्याचं खोटंच सांगितलं. हा खोटेपणा लक्षात आल्यानं त्यांनी नकार दिला. पण जबरदस्ती आणि दमदाटी करुन त्यांना कोर्टात नेले. तिथे त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन काही कागदपत्रांवर जबरदस्तीनं सह्या घेतल्या.

68 वर्षीय अशिक्षित महिलेला भाड्याच्या घरातून उचलून नेले आणि कोट्यवधींची जागा हडपण्यासाठी दबाव टाकला. पुराणिक बिल्डर्सच्या वतीने बँकेत 5 लाख रुपयेही भरले. हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. जमिनीच्या वाटण्या झालेल्या नसतानाही पार्वती आणि त्यांची मामेबहीण शैलाबाई कुऱ्हे यांची कसलीही संमती न घेता त्यांच्या जमिनीची पुराणिक बिल्डर प्रा.लि. यांनी परस्पर विक्री केली. या विरोधात पार्वती आणि शैलाबाई यांनी मालकी हक्काबाबत न्यायालयात दावा दाखल केला. पार्वती यांना मूलबाळ नसल्याने त्यांना फसवण्याचा प्रयत्न कोर्टात उधळला गेला.

दावा मागे घेण्यासाठी खोटी तडजोड आणि खोटं प्रतिज्ञापत्र सादर करुन त्यांची फसवणूक केल्याचं उघड झाल्यानंतर कोर्टानं अपहरणकर्त्यांवर गुन्हा दाखल करायला सांगितला. पुराणिक बिल्डर प्रा.लि. यांच्यासह सुनील शंकर बांदल, पोंक्षे वकील यांच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या एकाला अटक झाली असून, पोलिसांनी तपासही सुरु केला आहे. आता या प्रकरणी गुन्हे विभागाच्या चौकशीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

पाहा स्पेशल रिपोर्ट :