गोविंद बागेत ठरलं, राजू शेट्टी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर

| Updated on: Jun 16, 2020 | 5:09 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली (Raju Shetti meet Sharad Pawar).

गोविंद बागेत ठरलं, राजू शेट्टी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर
Follow us on

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीतील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली (Raju Shetti meet Sharad Pawar). या भेटीत राष्ट्रवादीच्या जागेवर राजू शेट्टी विधान परिषदेवर जाणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. या भेटीच्या वळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि इतर काही नेतेही होते. विशेष म्हणजे नुकतीच (11 जून) राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील राजू शेट्टी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान या दोघांमध्ये विधान परिषदेच्या जागेवर चर्चा झाली होती. यावेळी जयंत पाटील यांनी अंतिम निर्णय शरद पवार आल्यावर घेऊ असं आश्वासन दिलं होतं. आता राजू शेट्टी यांनी घेतलेल्या पवारांच्या भेटीत राजू शेट्टी यांची विधानपरिषदेवरील वर्णी निश्चित झाली आहे.

राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातून माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. (NCP nominate Raju Shetti Vidhan Parishad) याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राजू शेट्टी यांना शरद पवार कोकण दौऱ्यावरुन आल्यावर यावर अंतिम निर्णय घेतील असं सांगितलं होतं. त्यानंतर राजू शेट्टी आणि शरद पवार यांची ही भेट झाली.

दरम्यान, राजू शेट्टी म्हणाले होते, “मंत्री जयंत पाटील हे माझ्या आईच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी दोन दिवसापूर्वी आले होते. त्याचवेळी काही अनौपचारिक गप्पा झाल्या. बोलता बोलता ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या समझोत्याप्रमाणे, विधानपरिषदेची एक जागा देण्याबाबत ठरलं होतं. त्यावेळी आम्हाला काही देता आलं नाही, पण आता पवारसाहेब कोकण दौऱ्यावरुन मुंबईत आल्यावर चर्चा करुन निर्णय करण्याचा प्रयत्न करु. मला वाटतंय आठवडाभरात पवार साहेबांसोबत बैठक होईल. त्यावेळी होय की नाही ते ठरेल.”

विधानपरिषदेबाबत चर्चा

राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोट्यातील 4 पैकी एक जागा राजू शेट्टींना देण्याच्या तयारीत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ठरल्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानीला विधानपरिषदेची एक जागा देणार आहे. त्याबाबतच जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

विधानपरिषद निवडणूक

महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या होत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत. काँग्रेस आपल्या राजकीय नेत्याला राज्यपाल निर्देशित उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.

संबंधित बातम्या :

Raju Shetti | होय, जयंत पाटील घरी आले होते, विधानपरिषदेवर चर्चा झाली : राजू शेट्टी

राजू शेट्टींना राष्ट्रवादी विधानपरिषदेवर पाठवणार?