Sacred Games 2 | ‘नेटफ्लिक्स’वर दुबईतील भारतीयाची माफी मागण्याची वेळ

| Updated on: Aug 21, 2019 | 10:58 AM

सेक्रेड गेम्स 2 मध्ये गँगस्टर इसाचा नंबर म्हणून दुबईस्थित भारतीय कुन्हाब्दुल्ला यांचा मोबाईल क्रमांक दाखवला गेला. त्यामुळे नेटफ्लिक्सने माफी मागत त्या दृश्यातून संबंधित नंबर हटवला आहे.

Sacred Games 2 | नेटफ्लिक्सवर दुबईतील भारतीयाची माफी मागण्याची वेळ
Follow us on

मुंबई : नवाझुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) , सैफ अली खान (Saif Ali Khan), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘सेक्रेड गेम्स’ (Sacred Games 2) वेब सीरिजचा दुसरा सिझन धुमाकूळ घालत आहे. मात्र यातील एका दृश्यामुळे ‘नेटफ्लिक्स’ (Netflix) वर दुबईतील भारतीयाची माफी मागण्याची वेळ आली आहे. गँगस्टरच्या नावे दुबईतील भारतीय तरुणाचा फोन नंबर दाखवल्याने हा प्रकार घडला.

15 ऑगस्टला रात्री बारा वाजता ‘सेक्रेड गेम्स 2’ रिलीज झाला. त्यानंतर 37 वर्षीय कुन्हाब्दुल्ला यांचा फोन खणखणू लागला, तो थांबायचं नावच घेईना. ‘सेक्रेड गेम्स 2’ मधील गँगस्टर सुलेमान इसाचा नंबर म्हणून कुन्हाब्दुल्ला यांचा मोबाईल क्रमांक काही क्षणांसाठी झळकला होता.

‘भारत, पाकिस्तान, नेपाळ, यूएई आणि अख्ख्या जगभरातून गेल्या तीन दिवसांपासून मला सातत्याने फोन येत आहेत. काय होतंय मला कळतच नव्हतं.’ अशी प्रतिक्रिया कुन्हाब्दुल्ला यांनी ‘गल्फ न्यूज’ला दिली. मूळ केरळचे असलेले कुन्हाब्दुल्ला सध्या शारजात एका तेल कंपनीत कार्यरत आहेत.

‘फोनची रिंग ऐकून माझा थरकाप उडतो. मला माझा फोन नंबर कॅन्सल करायची इच्छा आहे. मला हा प्रॉब्लेम काही करुन सोडवायचा आहे.’ अशा शब्दात कुन्हाब्दुल्ला यांनी उद्विग्नता व्यक्त केली.

‘सेक्रेड गेम्स’ काय आहे, हेच त्यांना याआधी माहित नव्हतं. ‘सेक्रेड गेम्स’ हा व्हिडीओ गेमचा नवीन प्रकार आहे का? मी सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत काम करतो. मला अशा गोष्टींसाठी वेळ नाही’ अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

‘रविवारी दिवसभरात तीसहून जास्त फोन आले. माझ्या फोनची बॅटरी उतरत आहे. एका तासात पाच वेळा लोकांनी फोन करुन इसाची चौकशी केली. कोण आहे हा इसा? मला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही’ कुन्हाब्दुल्ला यांची चिडचिड काही थांबत नाही.

कधी दिसला कुन्हाब्दुल्लांचा नंबर?

केनियातील भारतीय अंडरकव्हर एजंट गणेश गायतोंडे (नवाझुद्दीन सिद्दीकी) ला एक चिठ्ठी देतो, त्यामध्ये क्रूरकर्मा गँगस्टर इसाचा नंबर लिहिला होता. चिठ्ठीवरचा नंबर स्पष्ट दिसत नसला, तरी सबटायटल्समध्ये तो लिहिलेला होता. नेटफ्लिक्सने कुन्हाब्दुल्ला यांची माफी मागत त्या दृश्यातून त्यांचा नंबर हटवला आहे.

सनी लिओन प्रकरणाची पुनरावृत्ती

‘अर्जुन पतियाला’ या चित्रपटात अभिनेत्री सनी लिओनने छोटीशी भूमिका केली आहे. एका सीनमध्ये ती दलजित दोसांजच्या व्यक्तिरेखेला आपला मोबाईल नंबर देते. हा सनीचा खराखुरा मोबाईल क्रमांक असल्याच्या समजूतीतून अनेक प्रेक्षकांनी तो टिपून घेतला. सिनेमा संपताच या क्रमांकावर फोन करण्याचा खेळ सुरु झाला होता.

हा नंबर होता दिल्लीतील प्रीतमपुरा भागाचा रहिवासी असलेल्या 27 वर्षीय पुनित अग्रवाल याचा. सनीसोबत बोलण्याची इच्छा व्यक्त करणारे अनेक फोन, अश्लील मेसेज त्याच्या क्रमांकावर येऊ लागल्यामुळे त्याला भलताच मनस्ताप झाला होता. सुरुवातीला कोणीतरी चेष्टामस्करी करत असेल, अशी त्याची समजूत झाली. मात्र हा प्रकार वाढतच गेल्याने त्याने पोलिसात धाव घेतली होती. दिवसाला शंभर ते दीडशे कॉल येत असल्याचं पुनितने तक्रारीत म्हटलं होतं.

‘तुला मनस्ताप व्हावा, अशी माझी इच्छा नव्हती. त्यामुळे मला माफ कर. मात्र तुला फारच इंटरेस्टिंग लोकांचे फोन आले असतील’ असं खट्याळपणे म्हणत सनीने या प्रकरणावर पडदा टाकला होता.