Sacred Games Review | अन् सेक्रेड गेम्सचा ‘शोले’ होता होता राहिला..!

सेक्रेड गेम्स 2 तिथूनच सुरू होतो जिथे पहिला संपला होता. सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीजननं, वेबसीरीजही इतक्या मोठ्या कॅनव्हॉसवर आणि सुपरस्टार्सला सोबत घेऊन बनवली जाऊ शकते हे सिद्ध केलं.

Sacred Games Review | अन् सेक्रेड गेम्सचा 'शोले' होता होता राहिला..!


तसं पाहता शोले सिनेमाचा आणि सेक्रेड गेम्सचा (Sacred Games) थेट काहीही संबंध नाही, पण, अंडरडॉग ठरवला गेलेला शोले सुपरडूपर हिट झाला आणि कल्ट बनला, तसंच काहीसं सेक्रेड गेम्सचंही (Sacred Games) झालं असतं, पण, या दुसऱ्या सीझननं घात केला.

सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीजननं, वेबसीरीजही इतक्या मोठ्या कॅनव्हॉसवर आणि सुपरस्टार्सला सोबत घेऊन बनवली जाऊ शकते हे सिद्ध केलं. एवढंच काय तर, कंटेट जबरा असेल तर प्रेक्षकही तितकाच प्रतिसाद देतात हेही स्पष्ट झालं. पहिला सीझन संपल्या संपल्या दुसरा सीझन कधी येणार याची विचारणा करून अनुरागला लोकांनी बेजार केलं.

सेक्रेड गेम्स 2 तिथूनच सुरू होतो जिथे पहिला संपला होता. मात्र, गेल्यावेळसारखी एकापाठोपाठ एक एपिसोड सलग बसून पाहण्याची उत्कंठा टिकवण्यात हा सीक्वल तितकासा यशस्वी ठरला नाही. अचानकच फ्लॅशबॅक पुन्हा करंट पुन्हा फ्लॅशबॅक पुन्हा करंट असं अनेकदा झालंय, त्यामुळे नेमका कोणता काळ सुरूय याबाबत संभ्रम होत राहतो.

मुंबईला अणूहल्ल्याचा धोका आहे हे पहिल्या एपिसोडमध्येच स्पष्ट झालं होतं. मात्र, असा धोका मुंबईच काय जगातल्या कुठल्याही शहराला झाला तरी भारतच काय तर अगदी अमेरिका, जापानसारखी बडी देशही लक्ष ठेवून असतात, हे याआधी कित्येकदा स्पष्ट झालंय. आणि, 26/11नंतर मुंबईवरही अनेक सुरक्षा एजन्सीज लक्ष ठेवून असतात हे ही माहितेय, दहशतवाद्यांच्या हाती ही शस्त्रं पडू नयेत यासाठी खबरदारी घेतली गेली, नसता आतापर्यंत त्यांनी त्याचा वापर केलाच असता, मात्र, सेक्रेड गेम्समध्ये एक गुरूजी अण्वस्त्र मिळवतात अन् पाकच्या मदतीनं तो मुंबईत फोडण्याचं कट-कारस्थान रचतात, सगळंच अजब तर्कट.

हॉलिवूडस्टाईल एडवेंचर, एक्शन, ड्रामा, डिझास्टर बनवण्याच्या प्रयत्नात सीरीज काहीशी कॉमेडी झालीय एवढं मात्र नक्की. एव्हेंजर्स एन्डगेममधल्या ‘हेल हायड्रा’ची कॉपी करत ‘अहमं ब्रह्मासमी’ चा जयघोष मात्र बऱ्यापैकी जमून आलाय.

बरं निव्वळ फिक्शन म्हणावं तर अगदी 9/11 ते 26/11 या दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख करून ते अगदी मॉब लिंचिंगपर्यंत सगळ्यांना सीरीजच्या स्टोरीशी जोडण्याची कसरत का केलीय? बरं, अनेक कॅरेक्टर्सना अचानक उपरती होते, अगदी सरताजपासून ते गायतोंडे ते पारूलकर सगळ्यांना! आणि ते व्हिलन ते स्टोरी टर्निंग कॅरेक्टर्स बनतात, दोन डिरेक्टर्समध्ये को-ऑर्डिनेशन नव्हतं की अजून काही गोची होती ते अनुराग आणि नीरजलाच माहित.

नेटफ्लिक्सनं सेक्रेड गेम्स-2च्या प्रमोशनसाठी कुठलीही कसर सोडली नाही, क्रिएटिव्ह रायटर्सची अगदी टीम रात्रंदिवस काम करत होती. सीरीज सुरू होण्याच्या आदल्या दिवशीचं हे ट्विट ट्रेंडमध्ये आलं.

मात्र, नींद का बलिदान व्यर्थ गेल्याची भावना कित्येकांमध्ये झाली.

सीरीजमध्ये अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहतात.  

गायतोंडे गुरूजींकडे नेमका कशासाठी जातो? सरताज सिंह आणि त्याचे वडिल दिलबाग हे ही गुरूजींकडे नेमके कशासाठी जातात? गुरूजी इतक्या खुलेपणे ड्रग्स आणि सेक्सचा खुलेआम प्रचार आणि प्रसार कसा करू शकतात? (पुन्हा ऐंशीच्या बॉलिवूड सिनेमाची आठवण)

  1. अणुहल्ला मुंबईतच का? आजूबाजूला कुठेही जिथे सुरक्षा तगडी नाही तिथे केला असता तरीही मुंबई खल्लास झालीच असती की?
  2. एक गुरू म्हणवून घेणारा अण्वस्त्र मिळवू शकतो? (काहीही हं)
  3. ऐंशीच्या सिनेमात दिसायचा तस्साच डिट्टो गोरा फॉरेनर नेमका कुणाच्या बाजूनं आहे, गुरूजीच्या की गायतोंडेच्या की सरताजच्या?
  4. मुंबईत अण्वस्त्र आणणं इतकं सोपं आहे? त्याचे रेडिएशन्स जोखण्यात सगळ्या यंत्रणा अगदी सगळ्याच यंत्रणा फेल?

रणवीर शौरीला घेतलंच कशासाठी?

अभिनयाच्या बाबतीत, रणवीर शौरीला निव्वळ वाया घालवलाय, कल्की केकलांही काही सीन वगळता ठिकठाकच. मात्र, होम मिनिस्टरच्या भूमिकेतला गिरीश कुलकर्णी, डीसीपी पारूलकरच्या भूमिकेतला नीरज काबी, जोजोच्या भूमिकेतली सुरवीन चावला, अमृता सुभाष, आमीर बशीर यांनी जबरा परफॉर्मन्स दिलेत.

नवाजुद्दिन सिद्दिकीचे पंकज त्रिपाठीसोबतचे शेवटचे काही टेन्स सीन निव्वळ हास्यास्पद वाटतात, बाकी दोघांनी आपापली भूमिका चोख बजावलीय. गेल्या सीझनमधले काटकर, राधिका आपटे यांना आपण मिस करत राहतो.

गंमत म्हणजे या सेक्रेड गेम्समध्ये अमृता सुभाषचा पती संदेश कुलकर्णीही आहे, पण, या दोघांचा एकत्र एकही सीन नाही. डिरेक्टर अनुराग कश्यपच्या दोन्ही पूर्वपत्नी या सीरीजसोबत जोडल्या गेलेल्या आहेत. कल्की आणि अनुरागचे सगळे सिनेमे एडिट करणारी आरती बजाजनचं सेक्रेड गेम्स एडिट केलाय.

विक्रमादित्य मोटवाने हवा होता?

डिरेक्शनच्या बाबतीत अनुरागसोबत विक्रमादित्य मोटवाने असला असता तर काही फरक पडला असता का असा प्रश्न पडतो, कारण, मसानचा डिरेक्टर नीरज घायवान हाही तितकाच चोख आहे. पण, तरीही कुठेतरी सीरीज आपल्या मुंबई सेंट्रल रेल्वेसारखी रखडत रखडत चाललीय असं वाटतं तर अनेकदा सीरीज ‘डी-रेल’ झाल्याचंही वाटत. अनेक सीन्स पाहताना असं वाटतं आपण ऐंशीच्या दशकातला सिनेमा तर पाहत नाही!

पाहावा की नको?

जर सेक्रेड गेम्स या सीरीजचे डाय हार्ड फॅन असाल तर नक्कीच पाहा, पुन्हा या सीरीजचे फॅन म्हणवून घ्यायचं की नाही याबाबत विचार कराल. का नको. आणि जर, पहायचाच असेल तर अजिबात अपेक्षा न ठेवता पाहा म्हणजे तितकासा अपेक्षाभंग होणार नाही. अगदी गणेश गायतोंडेच्या डायलॉगमध्येच सांगायचं झालं तर, पहिल्या सीरीजमध्ये “जब तक ये खेल खत्म नहीं होता अपून इधरीच है” पासून ते दुसऱ्या सीरीजमध्ये “बचेगा नहीं अपून, इधरीच खतम हो जाएगा”

अपेक्षाभंगावर उतारा

ता. क. अपेक्षाभंग झालाच असेल तर, ‘उतारा’ही आहे, नेटफ्लिक्सवरच यशराजची ‘पाऊडर’ ही सीरीज आहे. मात्र, नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन नसेल तर ही सीरीज MX Player या फ्री अॅपवरही आहे. ड्रग्स आणि माफिया यांच्या विरोधात इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज् कशा काम करतात हे फार लाऊड न करताही वास्तविकतेच्या अगदी जवळ नेऊन दाखवलंय. एकदा पहाच.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI