आम्ही शेवटपर्यंत वाट पाहिली पण…; विशाल पाटलांनी काँग्रेसवरची नाराजी बोलून दाखवली

| Updated on: Apr 22, 2024 | 6:17 PM

Vishal Patil on Congress and Sangli Loksabha Election 2024 : विशाल पाटलांची काँग्रेस पक्षावर नाराजी... सांगलीत पत्रकार परिषद घेत विशाल पाटील यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. विशाल पाटील यांनी नेमकं काय म्हटलं? सांगलीतील लढतीवर काय म्हणाले? वाचा सविस्तर...

आम्ही शेवटपर्यंत वाट पाहिली पण...; विशाल पाटलांनी काँग्रेसवरची नाराजी बोलून दाखवली
Follow us on

सांगली लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार आहे. भाजपचे संजयकाका पाटील विरूद्ध शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील अशी लढत होत असताना आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसचे नेते विशाल पाटील नाराज झाले. त्यांनी सांगलीतून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र विशाल पाटलांनी अर्ज मागे न घेतल्याने सांगलीत तिरंगी लढत होणार आहे. विशाल पाटील ‘लिफाफा’ या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. अशात पत्रकार परिषद घेत विशाल पाटलांनी काँग्रेसवरची आपली नाराजी बोलून दाखवली.

विशाल पाटील काय म्हणाले?

16 एप्रिलला कार्यकर्ते सोबत अर्ज भरला. जाहीरसभेत रेटा होता, अर्ज माघार घ्यायचा नाही. आम्ही माघार घेणार नव्हतो. कॉंग्रेसने एबी फॉर्म द्यावा ही अपेक्षा होती. दुःख वाटले की शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म आला नाही. मला अपेक्षा होती की मविआचा मी अधिकृत उमेदवार होईल. काही मविआमधील घटकानी कोणत्याही न कळणाऱ्या कारणासाठी उमेदवारी दिली. माझा अर्ज मागे घ्यावा. म्हणून अनेकांचे फोन आले. वेगवेगळी पदं देण्याची ऑफर आली. पण मला पदे नको होती, माझी उमेदवारी जनतेची आहे, असं विशाल पाटील म्हणाले.

ही लढत दुरंगीच- विशाल पाटील

कॉंग्रेसचा सामान्य कार्यकर्ता माझ्या मागे आहे. भाजपचा पाडाव आम्हीच करू शकतो. कॉंग्रेसचे चिन्ह जिल्ह्यातुन हद्दपार करण्याचे काहींनी काम केले. काँगेस पक्षाच्या विचाराचा खासदार लोक लिफाफा चिन्हावर निवडून देतील. सांगलीचा खासदार सांगलीकरच ठरवतील… ही निवडणूक दुरंगीच होणार आहे. काँगेसमधून बंडखोर करत मी आणि संजयकाकामध्येच लढत होणार आहे, असंही विशाल पाटलांनी म्हटलं आहे.

पूर्ण महाविकास आघाडीच्या विचारांचे मतदान मला मिळेल. ही निवडणूक तिरंगी नाही दुरंगी आहे. सक्षम उमेदवार येऊ नये यासाठी डाव केला. माझे नाव बॅलेटवर खालीच्या जागेवर नेले. पण तरीही सांगलीत काँग्रेस पक्षाच्या विचारांचा विशाल पाटील यांचा विजय होईल. आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. विश्वजित कदम यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी आज दुपारपर्यंत प्रयत्न केले. पण त्याला यश आलं नाही. पण ही जागा जिंकणार तर आम्हीच, असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे.