सावकाराची शेतकऱ्याला HIV चं इंजेक्शन टोचण्याची धमकी

सावकाराची शेतकऱ्याला HIV चं इंजेक्शन टोचण्याची धमकी

राजू गिरी, टीव्ही 9 मराठी, नांदेड: पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नांदेडमध्ये एका निष्पाप शेतकऱ्याचा बळी गेल्याचा आरोप आहे. सावकाराचा सततचा दबाव आणि एचआयव्ही या रोगाचं इंजेक्शन टोचण्याची धमकी या भीतीने शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. सावकाराकडून धमक्या मिळत असल्याची तक्रार देऊनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने, शेतकऱ्याचा बळी गेल्याचा आरोप, कुटुंबीयांनी केला आहे.

सुरेश गिरडे असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी सावकाराने पीडित कुटुंबाला एचआयव्हीचं इंजेक्शन टोचण्याची धमकी दिली होती.

सुरेश गिरडे यांनी संजय नागरगोजे आणि माधव कागने या सावकारांकडून दीड लाख रुपयांचं कर्ज घेतले होते. या बदल्यात गिरडे यांनी आपली एक एकर जमीन या दोन्ही सावकारांकडे गहाण ठेवली होती. कालांतराने गिरडे यांनी सावकाराचे दीड लाख रुपये परत केले. मात्र सावकारांनी गिरडेच्या कुटुंबाला त्रास देणे सुरुच ठेवल्याचा आरोप आहे.

सातत्याने मिळत असलेल्या धमक्यांमुळे गिरडे यांच्या पत्नीने 12 नोव्हेंबरला ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत रितसर तक्रार केली होती. पण या तक्रारीकडे पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप गिरडे कुटुंबाचा आहे. त्यामुळे आरोपी सावकारांची हिंमत वाढली आणि आरोपींनी गिरडे यांच्या कुटुंबाला धमकावणे सुरुच ठेवले.

या धमक्यांमुळे सुरेश गिरडे घाबरुन गेले. भीतीच्या दबावात असलेल्या गिरडे यांना हृदयविकाराने गाठले. सुरेश यांच्या मृत्यूला पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप, त्यांच्या पत्नी आणि मुलीने केला आहे. तसंच गुन्हा दाखल होत नाही, तोवर मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला.

अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, या दबावानंतर रात्री ग्रामीण पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

पूर्वकल्पना दिल्यानंतर कुठलाही गुन्हा घडता कामा नये, याबाबत घबरदारी घेणं पोलिसांचं काम आहे. मात्र नांदेड ग्रामीण पोलिसांनी सारे संकेत धाब्यावर बसवले. जर त्यांनी वेळीच पावलं उचलली असती, तर  आज सुरेश यांचा बळी गेला नसता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI