टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून ऊसतोड कामगाराच्या मुलीची आत्महत्या

टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून ऊसतोड कामगाराच्या मुलीची आत्महत्या

बीड : बापाच्या हातातला कोयता कायमस्वरुपी सोडवण्यासाठी दिवसरात्र अभ्यास करत असलेल्या मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील ही घटना आहे. नववीत शिकणाऱ्या या मुलीने अनेकदा मुख्याध्यापकांकडे तक्रारही केली. पण काहीही फायदा झाला नाही. महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांकडून तिची छेड काढणं सुरुच होतं. अखेर या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केली. हे आरोपी फरार असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शाळा-महाविद्यालयांमधील छेडछाड आणि तेही दिवसाढवळ्या एका मुलीला शाळेत येणं अवघड होणं ही परिस्थिती महाराष्ट्रातली आहे यावर विश्वास बसणार नाही. पण महाराष्ट्रात आणि बीड जिल्ह्यात हे घडलंय. मुलं छेड काढत असल्याचं तिने अनेकदा शिक्षकांना सांगितलं. पण शिक्षकांनी याकडे दुर्लक्ष केलं. हा त्रास सहन न झाल्यानंतर पीडित मुलगी घरी आली आणि तिने विष प्राशन केलं. यानंतर तिला माजलगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण अखेर तिची प्राणज्योत मालवली.

पीडित मुलीचे आई-वडील ऊसतोड कामगार आहेत. आई गावातच ऊस तोडते, तर वडील कर्नाटकात ऊसतोडीसाठी गेलेले होते. गरीब कुटुंबातील मुलीच्या परिस्थितीचा फायदा घेत या टवाळ पोरांनी मानसिक त्रास देणं सुरु केलं. नववीत अभ्यास करुन बापाच्या हातातला कोयता सोडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या मुलीला हा त्रास सहन झाला नाही. अखेर तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. आरोपींना पकडून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करताना पीडितेच्या आई-वडिलांना अश्रू आवरत नाहीत.

पीडित मुलगी शाळेत अत्यंत हुशार होती. शाळेत तिच्या हस्ताक्षराचं कौतुक केलं जायचं. शिक्षकांनी जर वेळीच लक्ष दिलं असतं तर आपल्या नातीवर आत्महत्येची वेळ आली नसती, असं सांगताना आजीचे डोळे भरुन येतात. शाळा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी आम्हाला आता भीती वाटायला लागली असल्याचं पीडितेच्या मैत्रीणी सांगतात.

पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन अमर तिडके आणि हनुमंत सावंत या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे दोघेही फरार असून त्यांच्या मागावर पोलिसांचं पथक रवाना झालंय. ऊसतोड कामगारांच्या मुलांना अनेक हालउपेक्षांना सामोरं जावं लागतं. त्यांना वेळेवर शिक्षणही मिळत नाही. पण जे संघर्ष करुन शिक्षण घेतात त्यांना असे नराधम जगू देत नाहीत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI