राष्ट्रवादीची पक्षबांधणी सुरु; मिरा-भाईंदरमध्ये जितेंद्र आव्हाड फुंकणार NCP मध्ये प्राण

| Updated on: Oct 31, 2020 | 11:16 AM

मीरा भाईंदरमध्ये संपुष्टात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जिवंत करण्याची जबाबदारी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या खांद्यावर सोपवली आहे

राष्ट्रवादीची पक्षबांधणी सुरु; मिरा-भाईंदरमध्ये जितेंद्र आव्हाड फुंकणार NCP मध्ये प्राण
Follow us on

मीरा भाईंदर : मीरा भाईंदरमध्ये संपुष्टात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जिवंत करण्याची जबाबदारी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या खांद्यावर सोपवली आहे. त्याकरिता मीरा रोडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, मीरा भाईंदर समन्वयक आनंद परांजपे, मीरा भाईंदर निरीक्षण संतोष धुवाळी आणि प्रमोद सरोदे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Sharad Pawar given the work of NCP in Mira Bhayandar to Jitendra Awhad)

“मीरा भाईंदर शहर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. पक्षाकडे चांगले कार्यकर्ते होते. पक्षाने चांगली संघटना बांधली होती. पण ज्यांच्या खांद्यावर पक्षाने जबाबदारी टाकली होती, त्यांनी पळून जाण्याची भूमिका घेतली. मीरा भाईंदरमध्ये पक्षाची पुन्हा नव्याने बांधणी करण्याची जबाबदारी आता माझ्याकडे दिली गेली आहे. आपण पदाधिकारी-कार्यकर्ते मिळून एवढं चांगलं काम करु की इथे पक्ष पहिला जसा भक्कमपणे पाय रोवून उभा होता त्याचपद्धतीने आतादेखील पक्ष जोमाने उभा करु”, असं आव्हाड म्हणाले.

“जे कोणी गेले असतील त्यांना जाऊ द्या. जे राहिले त्यांच्यावर प्रामाणिकतेने विश्वास ठेवून आता आपल्याला पुढची लढाई लढायची आहे”, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना जागवली. तसंच यापुढच्या काळामध्ये मीरा भाईंदरमध्ये पक्षसंघटना बळकट करण्याचं काम पदाधिकारी-कार्यकर्त्यांना जोमाने करायचं असल्याची सूचना केली.

“आमच्या एका कार्यकर्त्याचं हॉटेल होतं. त्या हॉटेलला अनधिकृत म्हणून पालिका अधिकाऱ्यांनी 3 वेळा जाऊन तोडलं. मी 124 अनधिकृत हॉटल्सची यादी जाहीर करतो. जर आयुक्तांमध्ये हिम्मत असेल तर 124 अनधिकृत हॉटेल्स पाडून दाखवावीत”, असं आव्हान आव्हाड यांनी पालिका आयुक्तांना दिलं.

“आयुक्त कोणाला तरी खूश करण्यासाठी काम करत असेल तर गाठ आमचीच आहे. इथे बसलेले अधिकारी काय करत असतात?, कोण किती भ्रष्टाचारी आहे?, याची यादी आम्ही खिशात घेवून फिरतो”, असं म्हणत भाजपची सत्ता असलेल्या मीरा भाईंदर स्थानिक सत्ताधाऱ्यांवर आव्हाडांनी बोचरे वार केले. (Sharad Pawar given the work of NCP in Mira Bhayandar to Jitendra Awhad)

संबंधित बातम्या

‘…हा आचारसंहितेचा भंग आहे’, बिहार निवडणुकांवरून जितेंद्र आव्हाडांची भाजपवर टीका

‘त्या’ शब्दाला विरोध म्हणजे पूर्ण संविधानालाच विरोध करण्यासारखं, जितेंद्र आव्हाडांचा राज्यपालांवर पलटवार