चिमुकल्याच्या बर्थडे सेलिब्रेशनला काट, ठाण्याच्या कुटुंबाचं 200 आदिवासींना खिचडी वाटप

ठाण्याच्या उऱ्हेकर कुटुंबाने आपल्या चिमुकल्याच्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून 200 आदिवासींच्या जेवणाची सोय केली. (Thane Family helps Murbad tribal)

चिमुकल्याच्या बर्थडे सेलिब्रेशनला काट, ठाण्याच्या कुटुंबाचं 200 आदिवासींना खिचडी वाटप
| Updated on: Apr 09, 2020 | 3:40 PM

मुंबई : ‘कोरोना’च्या संकटकाळात विविध स्तरातील व्यक्ती मदतीचा हात पुढे करताना दिसत आहे. लहान मुलांनीही आपल्या पॉकेटमनीचे किंवा वाढदिवसाचे पैसे वाचवून मदत केल्याचं पाहायला मिळत आहे. ठाण्याच्या उऱ्हेकर कुटुंबाने आपल्या चिमुकल्याच्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून 200 आदिवासींच्या जेवणाची सोय केली. (Thane Family helps Murbad tribal)

लहान मुलांचा वाढदिवस घरी साजरा करायचा झाला, तरी केक, सेलिब्रेशन आणि रिटर्न गिफ्ट हे सगळं आलंच. यासाठी होणारा खर्च आला. ठाण्याच्या आरव उऱ्हेकरचा आज (9 एप्रिल) दुसरा वाढदिवस. पण यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. संपूर्ण देशभरात कोरोनाने थैमान घातले असल्याने देश लॉकडाऊन आहे.

हेही वाचाफक्त आवाज द्या, ‘खाकी’ घालून तुमच्या खांद्याला खांदा लावतो, ‘सिंघम’ अजय देवगण पोलिसांसह मैदानात

रोजंदारीवर काम करत असलेल्या बऱ्याच लोकांवर सध्या दोन वेळच्या जेवणाची समस्या ओढवली आहे. अशातच या काळात दीपक देशमुख हे मुरबाडजवळ असलेल्या जवळपास 200 आदिवासी बांधवांना एक वेळ खिचडी वाटप करत आहेत. लॉकडाऊन असेपर्यंत ते हा उपक्रम चालवणार आहेत.

हेही वाचा : कोरोनाच्या लढाईत चिमुकलेही सरसावले

हा उपक्रम कळताच उऱ्हेकर कुटुंबाने आरवचा वाढदिवस साजरा न करता ती रक्कम देशमुख यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज 200 आदिवासी बांधवांना खिचडी वाटप करण्यात आले. संकट काळात इतरांच्या मदतीला धावून जाण्याचं सामाजिक भान सर्वांनी राखावं, असं म्हटलं जात आहे.

दरम्यान, बीडमधून दोन चिमुकलेही आर्थिक मदतीसाठी सरसावले आहेत, एकाने स्वतःला मिळालेल्या बक्षिसाची 10 हजार रुपयांची रक्कम, तर दुसऱ्याने पॉकेटमनीचे 10 हजार रुपये धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केलेत. गंगाधर धशे आणि संविधान दीपक गडसिंगे अशी या मुलांची नावं आहेत. या संकटाच्या काळात या चिमुकल्यांनी दाखवलेल्या प्रगल्भपणाने नागरिकांकडून चांगलंच कौतुक होत आहे.