काका, पुतण्यात एका जागेवरून गणित बिघडलं, घेतला एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय, नेत्याने केला चर्चेचा मार्ग बंद

| Updated on: Mar 18, 2024 | 11:06 PM

बिहारमधील 40 जागांसाठी एनडीएमध्ये जागावाटप झाले. येथे भाजप 17 तर जेडीयू 16 जागा लढवणार आहे. चिराग पासवान यांच्या खात्यात 5 जागा आल्या आहेत. मात्र, एका जागेवरून एका बड्या नेत्याचे बिनसले आणि त्याने थेट एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

काका, पुतण्यात एका जागेवरून गणित बिघडलं, घेतला एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय, नेत्याने केला चर्चेचा मार्ग बंद
lok janshakti party
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 18 मार्च 2024 : बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांच्या जागावाटपाचा मुद्दा अखेर निकाली निघाला आहे. येथील 40 पैकी 17 जागांवर भाजप, 16 जागांवर जेडीयू, 5 जागांवर लोजपा तर हिंदुस्थानी अवामी मोर्चा (HAM) आणि उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा प्रत्येकी एक जागा लढविणार आहे. जेडीयूपेक्षा भाजपला जास्त जागा मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजप आणि जेडीयूने प्रत्येकी 17 जागांवर निवडणूक लढवली होती. तर, लोजपाला 6 जागा मिळाल्या होत्या. पण, या जागावाटपात एका बड्या नेत्याला एक जागा न मिळाल्याने त्याने एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या जेडीयू पक्षाप्रमाणेच दिवंगत नेते रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाची देखील ताकद आहे. दलित मतदारांना अजूनही रामविलास पासवान या नावाची भुरळ आहे. रामविलास पासवान यांच्या मृत्युनंतर मात्र त्यांच्या पक्षात दोन गट पडले. एका गटाचे नेतृत्व त्यांचा मुलगा चिराग पासवान करत आहे. तर, दुसऱ्या गटाचे नेतृत्व रामविलास पासवान यांचे बंधू पशुपती पारस करत आहेत.

जागावाटपाच्या फौर्म्युल्यामध्ये पशुपती पारस यांनी हाजीपूर या मतदारसंघाची मागणी केली होती. मात्र, चिराग पासवान यांनीही त्याच जागेसाठी आग्रह धरला होता. या एकाच जागेवरून जागावाटपाचे गणित बिघडले आणि पशुपती पारस यांनी एनडीए बाहेरचा रस्ता धरला.

हाजीपूर मतदारसंघ इतका महत्वाचा का?

काका पशुपती पारस आणि पुतण्या चिराग पासवान यांनी दावा सांगितलेला हाजीपूर हा मतदारसंघ इतका महत्वाचा का आहे? याचे कारण म्हणजे याच मतदारसंघातून दिवंगत रामविलास पासवान हे नऊ वेळा खासदार झाले होते. तर, त्यांच्यानंतर 2019 मध्ये निवडणूक जिंकून पशुपती पारस येथून पहिल्यांदा लोकसभेत पोहोचले होते.

दिवंगत रामविलास पासवान यांनी 1977 मध्ये एक मोठा विक्रम केला होता. त्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा तब्बल 4.25 लाख मतांनी पराभव केला होता. एखाद्या नेत्याने एवढा मोठा विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती. या विजयाची नोंद गिनीज बुकमध्येही झाली होती. यानंतर 1984 आणि 2009 या निवडणुका वगळता इतर सर्व निवडणुका जिंकल्या होत्या.

हाजीपूरची जागा रामविलास पासवान यांच्याशी नाते सांगणारी आहे. रामविलास यांनी दलितांचे नेते म्हणून स्वत:ला सिद्ध केले. याच आधारावर त्यांनी 2000 साली स्वतःचा लोक जनशक्ती पक्ष (LJP) स्थापन केला. केंद्रात रेल्वेमंत्री असताना त्यांनी हाजीपूर येथे रेल्वेचे प्रादेशिक कार्यालयही उघडले. त्यामुळे कामे करून घेणारा नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती. परंतु, रामविलास पासवान यांच्यानंतर काका पशुपती पारस आणि मुलगा चिराग यांनी त्यांच्या हाजीपूर जागेवर दावा केला आहे.

पशुपती पारस हे येथून विद्यमान खासदार आहेत. तर, चिराग सध्या जमुई मतदारसंघातून खासदार आहेत. परंतु, रामविलास पासवान यांचा वारसा पुढे नेण्यासाठी दोघांनाही हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. एनडीए पशुपती पारस यांना समस्तीपूरची जागा देण्यास तयार होते. पण, त्यांनी ती नाकारली. या जिद्दीने त्यांना मागे टाकले आणि ही जागा चिराग पासवान यांना मिळाली. एनडीएने ही जागा पशुपती पारस यांना दिली नसल्याचे ते लवकरच केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा आहे.