तुकाराम मुंढेंचे ‘छडी लागे छमछम’, कर्मचाऱ्यांसाठी सहा नियमांचं पत्रक

कार्यालयीन शिस्तीचं पालन करण्यासाठी नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सहा नियमांचं परिपत्रकच काढलं आहे

तुकाराम मुंढेंचे छडी लागे छमछम, कर्मचाऱ्यांसाठी सहा नियमांचं पत्रक
| Updated on: Feb 07, 2020 | 9:03 AM

नागपूर : कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेले नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. शहरातील अनेक चुकीच्या बाबी मार्गावर आणण्याचा विडा उचलला असतानाच, महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही वळण लावण्याचा प्रयत्न मुंढेंनी (Tukaram Mundhe Rules NMC) सुरु केला आहे.

कार्यालयीन शिस्तीचं पालन करण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी परिपत्रकच काढलं आहे. मंजूर झालेल्या सुट्ट्यांचंच वेतन कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन झाल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्याचा दणकाही मुंढेंनी दिला आहे.

तुकाराम मुंढेंनी जारी केलेल्या परिपत्रकातील ठळक बाबी

1. मंजुरीशिवाय सुट्टी घेतली, तर पगार कापला जाणार

2. तीन दिवस उशीर झाल्यास (लेटमार्क) एका दिवसाची सुट्टी कमी करण्यात येईल

3. कार्यालयीतील भिंतींवर कुठलाही कागद, परिपत्रक दिसल्यास कारवाई

4. अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ई-गव्हर्नन्स प्रणालीचा वापर बंधनकारक

5. अधिकारी, कर्मचाऱ्यांना विभागप्रमुखांकडेच आवश्‍यक बाबींची मागणी करावी लागेल

6. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन झाल्यास प्रशासकीय कार्यवाही

नागपूर पालिका आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुकाराम मुंढेंनी चार कर्मचाऱ्यांना दणका दिला होता. कामात अनियमितता आढळल्याने लेखा आणि वित्त विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश, तुकाराम मुंढे यांनी दिले होते. तुकाराम मुंढे यांनी रुजू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लेखा आणि वित्त विभागाची पाहणी केली होती.

आयएएस तुकाराम मुंढे यांच्या नावाचाच एवढा दरारा आहे, की त्यांच्या बदलीची ऑर्डर निघाली आणि ते रुजू होण्यापूर्वीच नागपूर मनपाचे कर्मचारी आणि अधिकारी वेळेत कार्यालयात यायला लागले. गेल्या मंगळवारपासून मुंढे रुजू झाल्यानंतर तर अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना धडकीच भरली.

पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे पहिल्या दिवशी वेळेआधी 9:30 च्या ठोक्याला कार्यालयात आले. तर दुसऱ्या दिवशीही तुकाराम मुंढे वेळेपूर्वी 9:40 च्या ठोक्याला कार्यालयात दाखल झाले. पहिल्याच बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांचा क्लास घेतला आणि काम न करणाऱ्यांना घरी जावं लागेल, असा इशारा दिला. दिवसभर तब्बल सहा बैठका घेऊन कामांचा आढावा घेतला, जनता दरबारही सुरु (Tukaram Mundhe Rules NMC) केला.