सरकार आल्यास सातबारा कोरा, शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसून उद्धव ठाकरेंचा शब्द

| Updated on: Nov 03, 2019 | 12:55 PM

'माझं वचन आहे, आपलं सरकार आल्यास सातबारा कोरा करेन. दहा हजार कोटी कमी आहेत, ते वाढवले जातील', असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं.

सरकार आल्यास सातबारा कोरा, शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसून उद्धव ठाकरेंचा शब्द
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबादेतील शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. आपलं सरकार आल्यास सातबारा कोरा करीन, हे माझं वचन आहे, अशी घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. एकीकडे सत्तास्थापनेची लगबग सुरु असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Aurangabad Tour) मराठवाडा दौऱ्यावर निघाले आहेत.

‘माझं वचन आहे, आपलं सरकार आल्यास सातबारा कोरा करेन. दहा हजार कोटी कमी आहेत, ते वाढवले जातील’, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं. मत देताना तुम्ही आधार कार्ड किंवा कागदपत्रं विचारली नाहीत, आम्ही पण तुम्हाला कागदपत्रं विचारणार नाही. सर्व अडथळे बाजूला सारुन शेतकऱ्यांना मदत देऊ, अशी हमी उद्धव ठाकरे यांनी दिली.

मी नेता म्हणून नाही, तर कुटुंब म्हणून आलो आहे. कारण भलेभले नेते मोठं झाल्यावर विसरुन जातात. पण मी तुम्हाला धीर द्यायला आलो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पिकांच्या नुकसानीचा पाहणी दौरा, भरपावसात खासदार चिखलीकर शेतकऱ्यांच्या बांधावर

कन्नड तालुक्यातील कानडगाव आणि वैजापूर तालुक्यातील गारज या दोन गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी उद्धव ठाकरे करत आहेत. यावेळी आमदार सुभाष देसाई, आमदार एकनाथ शिंदे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार अर्जुन खोतकर असे शिवसेनेचे दिग्गज नेतेही उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray Aurangabad Tour) आहेत.

उद्धव ठाकरे आपला दौरा आटोपून औरंगाबादच्या विभागीय कार्यालयात एक बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. 2014 मध्ये शिवसेनेने शेतकऱ्यांच्या प्रशांवरुन रान उठवल्यानंतर त्यांना सत्तेत योग्य तो वाटा मिळालाच होता. आता पुन्हा एकदा शेतकरी प्रश्नांवरुन रान उठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पदरात नक्की पडेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.